“..तर इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा”; उद्धव ठाकरेंचा निवडणूक आयोगाला टोला

मुंबई | महाविकास आघाडी (मविआ) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (मनसे) नेत्यांनी आज राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम आणि निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची भेट घेतली. या भेटीत मतदार याद्यांमधील अनियमितता आणि घोळ यावर नेत्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
उद्धव ठाकरे म्हणाले, की आम्ही निवडणूक अधिकाऱ्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे की तुम्हाला निष्पक्षपणे, पारदर्शकपणे निवडणुका घ्यायच्या असतील तरच या निवडणुका घ्या अन्यथा तुम्ही इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा.
लोकशाहीच्या रक्षणासाठी सर्व राजकीय पक्ष एकत्र आले आहेत. आम्ही भारतीय जनता पार्टीला देखील पत्र पाठवलं होतं की तुम्ही देखील या चर्चेला. परंतु, ते काही आले नाहीत. काल झालेल्या बैठकीला आणि आजच्या बैठकीला भाजपाकडून कोणीही आलं नाही. काल व आजच्या बैठकीत मतदार याद्यांमध्ये मोठा घोळ असल्याचं आम्ही निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
हेही वाचा : अभिनयाचा बादशाह बिग बींनी थोपटली पुरंदरच्या रांगोळी चित्रकाराची पाठ!
मागील विधानसभा निवडणुकीवेळी या गोष्टी लक्षात आल्या होत्या. यासंदर्भात १९ ऑक्टोबर रोजी म्हणजेच विधानसभा निवडणुकीच्या एक महिना आधी महाविकास आघाडीने निवडणूक आयोगाला पत्र दिलं होतं. त्यावेळी आम्ही सांगितलं होतं की काही भाजपा कार्यकर्ते मतदारयादीशी खेळतायत. त्यांना वाटेल त्या व्यक्तीला ते मतदार यादीत घुसवतायत, त्यांना वाटेल त्या व्यक्तीचं नाव यादीतून वगळलं जात आहे, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
एकाच घरात २०० ते ४०० लोक राहात असल्याचं यादीत पाहायला मिळालं. या लोकांनी लोकशाहीचा खेळखंडोबा करून ठेवला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना सांगितलं की निष्पक्ष निवडणुका घ्यायच्या असतील तरच घ्या. नाहीतरी इलेक्शनपेक्षा सिलेक्शन करून मोकळे व्हा, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.