मुंबईतील किड्स इंडिया प्रदर्शनाला उदंड प्रतिसाद, विदेशी व्यापारीही सहभागी
जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटरमध्ये ट्रेड शो आयोजित
मुंबई : दरवर्षीप्रमाणे यंदाही किड्स इंडिया ट्रेड शो आयोजन करण्यात आले होते. यात तुम्हाला लहान मुलांच्या कपड्यांपासून ते खेळण्यापर्यंतच्या आणि अभ्यासपासून ते अगदी माईंड गेमपर्यंतच्या अनेक वस्तू पाहायला मिळू शकतात. भारतातच नव्हे तर संपूर्ण जगभरात हा ट्रेड शो प्रचंड प्रसिद्ध आहे. या कार्यक्रमाचे आयोजन स्पिल्वारेनमेसे इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडून करण्यात आले आहे. या प्रदर्शनाला अनेकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कनव्हेशन सेंटरमध्ये हा ट्रेड शो आयोजित करण्यात आला. १२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर असे तीन दिवस आयोजित केलेल्या या कार्यक्रमात अनेक उद्योगपती, छोटे-मोठे व्यापारी यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमासाठी साधारण २ ते ३ हजाराच्या आसपास व्यापारी उपस्थित होते. या प्रदर्शनाला या राज्यासह भारतातील अनेक लहान उद्योगांनी हजेरी लावली.
स्टार्टअप कंपन्याही सहभागी
यात लाकडापासून निर्मित होणारी खेळणी, विविध कपडे, वस्तू, मेकअप या सर्व गोष्टींचा समावेश होता. तसेच लहान बाळांच्या अनेक खेळणीही यावेळी उपलब्ध होत्या. विशेष म्हणजे फक्त खेळणीच नव्हे तर अभ्यासासाठी लागणारी काही पुस्तक, गोष्टींची पुस्तकही यावेळी उपलब्ध होती. तसेच विविध उत्पादन श्रेणीमध्ये इलेक्ट्रॉनिक आणि शैक्षणिक खेळण्यांचाही यात समावेश होता. यंदा या ट्रेड शोसाठी १२० पेक्षा जास्त प्रदर्शकांनी आपआपली उत्पादने प्रदर्शनसाठी मांडली होती. तर १५० हून अधिक स्टार्टअप कंपन्याही यात सहभागी झाल्या होत्या. फक्त भारतातील नव्हे तर ३३ देशातील ५ हजारांहून अधिक विदेशी व्यापारीही यात प्रदर्शनात सहभागी झाले होते.
किड्स इंडिया हा ट्रेड शोमध्ये येत्या वर्षभरात भारतासह जगभरात वर्षभरात कोणकोणते नवनवीन उत्पादने येणार आहेत, याचा एक विस्तृत आढावा देतो. यात दरवर्षी विविध नवनवीन उत्पादनेही पाहायला मिळतात. गेली दोन वर्षे करोनामुळे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. त्यानंतर आता १२ ते १४ सप्टेंबर या दरम्यान हे प्रदर्शन पार पडले. या प्रदर्शनाला अनेक व्यापारांनी हजेरी लावली. विशेष म्हणजे अनेकांनी नवनवीन उत्पादन खरेदी करण्यासाठी व त्याचा व्यापार करण्यासाठी पाठिंबाही दिला.
भारतातील अनेक खेळण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळख
गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही किड्स इंडिया हे प्रदर्शन भरवत आहोत. यात लहान मुलांसाठी नवनवीन खेळणी, शैक्षणिक साहित्य आणि काही इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींचाही समावेश असतो. या प्रदर्शनाला राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक उद्योजक हजेरी लावतात. तसेच या खेळणींचा दर्जाही अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट असतो. या प्रदर्शनामुळे भारतातील अनेक खेळण्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर एक विशेष ओळख मिळवून दिली आहे, अशी माहिती स्पिल्वारेनमेसे या कंपनीचे प्रवक्ते क्रिश्चियन उल्रिख यांनी दिली.