भारत-पाकिस्तान शस्त्रविरामानंतर आता डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा; म्हणे, “मोदींनी शब्द दिलाय रशियाकडून तेल खरेदी करणार नाही”

Donald Trump: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकताच दावा केला आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना शब्द दिला आहे की भारत रशियाकडून तेल खरेदी थांबवेल आणि युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या त्यांच्या प्रयत्नात हे एक मोठे पाऊल असेल.
व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना ट्रम्प म्हणाले की, त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे भारताकडून रशियन कच्च्या तेलाच्या सततच्या आयातीबाबत चिंता व्यक्त केली आहे. अमेरिकेचे मत आहे की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी करत असल्यामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या युद्ध यंत्रणेला निधी मिळण्यास मदत होत आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाऊसमध्ये पत्रकारांना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मला शब्द दिला आहे की, भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी थांबवेल. युक्रेनमधील युद्धावरून रशियाला एकाकी पाडण्याच्या प्रयत्नातील हे एक मोठे पाऊल आहे. आता आम्ही चीनलाही हेच करायला लावणार आहोत.”
चीनसोबतच्या तणावाच्या काळात भारताला एक विश्वासार्ह भागीदार म्हणून पाहता का, असे विचारले असता डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, “ऊर्जा धोरणावरून वाद असूनही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत. ते माझे मित्र आहेत.”
हेही वाचा – कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज
डोनाल्ड ट्रम्प यांनी हा दावा केला असला तरी भारत रशियन तेल आयात थांबवेल या त्यांच्या दाव्याला भारताने अद्याप अधिकृत दुजोरा दिलेला नाही. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी अनेकदा भारत-पाकिस्तानमधील लष्करी संघर्ष थांबवल्याचे दावेही केले होते. मात्र, भारताने त्यांचे दावे फेटाळून लावले होते.
डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, नरेंद्र मोदी यांचे आश्वासन मिळवणे हे रशियाच्या ऊर्जा उत्पन्नात कपात करण्याच्या त्यांच्या राजनैतिक प्रयत्नांचा एक भाग होता. “आता आपल्याला चीनलाही हेच करायला लावावे लागेल. चीनवर दबाव आणणे गेल्या आठवड्यात मध्य पूर्वेत आपण जे केले त्याच्या तुलनेत अधिक सोपे असेल.”
डोनाल्ड ट्रम्प यांनी काही दिवसांपूर्वी भारतातील अमेरिकेचे राजदूत म्हणून सर्जियो गोर यांची नियुक्ती केली आहे. सर्जियो गोर यांनी नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे. त्यानंतर काही दिवसांतच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या रशियन तेल खरेदीबाबत ही घोषणा केली आहे.




