Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘आषाढी वारीत वारकऱ्यांचे आरोग्य, सुरक्षितता हीच सर्वोच्च प्राथमिकता’; आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पंढरपूर : आषाढी वारीसाठी पंढरपुरात दाखल होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या आरोग्यासंदर्भात आवश्यक त्या उपाययोजनांसाठी राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी रविवारी उपजिल्हा रुग्णालय, पंढरपूर येथे प्रत्यक्ष भेट देऊन आरोग्य व्यवस्थेची सखोल पाहणी केली. वारीदरम्यान कोणत्याही भाविकाला उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागू नये, प्रत्येक रुग्णाला वेळेत आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळावेत तसेच संपूर्ण आरोग्य यंत्रणा २४ तास सतर्क ठेवावी, अशा सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी आरोग्यमंत्र्यांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवा, अतिदक्षता विभाग (आयसीयू), औषधसाठा, डॉक्टर व परिचारिकांची उपलब्धता, वैद्यकीय मनुष्यबळ, रुग्ण व्यवस्थापन, स्वच्छता व्यवस्था तसेच वारकरी भाविकांसाठी उभारण्यात आलेल्या विशेष आरोग्य सुविधांचा आढावा घेतला. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

वारीच्या काळात उष्माघात, ताप, संसर्गजन्य आजार, अपघात अथवा इतर आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्यावर तातडीने उपचार करता यावेत, यासाठी डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी, रुग्णवाहिका सेवा आणि आवश्यक जीवनरक्षक उपकरणे सदैव सज्ज ठेवण्यावर त्यांनी विशेष भर दिला. रुग्णालय परिसरातील स्वच्छता, निर्जंतुकीकरण आणि संसर्ग प्रतिबंधक उपायांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या.

हेही वाचा –  ‘रत्नागिरी विमानतळाचा ७५% टप्पा पूर्ण; ३ महिन्यांत पहिले टेकऑफ तर वर्षभरात पंचतारांकित हॉटेल’; पालकमंत्री उदय सामंत

आरोग्यमंत्री श्री. आबिटकर म्हणाले, आषाढी वारी हा महाराष्ट्राच्या श्रद्धा, समता आणि सेवाभावाचा महासोहळा आहे. लाखो वारकरी विठुरायाच्या दर्शनासाठी पायी प्रवास करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. प्रत्येक वारकऱ्याला तातडीची, सुरक्षित आणि दर्जेदार आरोग्यसेवा मिळावी, यासाठी आरोग्य विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत.

वारकऱ्यांचे आरोग्य आणि सुरक्षितता हीच आमची सर्वोच्च प्राथमिकता आहे. कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. प्रत्येक भाविक सुरक्षितपणे वारी पूर्ण करून सुखरूप घरी परतेल, यासाठी शासन कटिबद्ध आहे, असेही आरोग्यमंत्री श्री. आबिटकर यांनी सांगितले.

आषाढी वारीदरम्यान राज्यभरातून येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांच्या सेवेसाठी उपजिल्हा रुग्णालयासह विविध आरोग्य केंद्रांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ, औषधसाठा, रुग्णवाहिका सेवा, आपत्कालीन वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक उपकरणांची उपलब्धता सुनिश्चित करण्यात आली आहे. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने कार्य करून यंदाची वारी आरोग्यदायी, सुरक्षित आणि निर्विघ्न पार पाडावी, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button