Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

‘होर्मुझ’मधून पहिले तेल जहाज मुंबई किनारी

मुंबई : अमेरिका-इस्रायल आणि इराणमध्ये युद्ध सुरू झाल्यानंतर तब्बल 12 दिवसांनी धोकादायक होर्मुझ सामुद्रधुनीतून पहिले तेल जहाज मुंबईच्या किनारी लागले. सौदीचे कच्चे तेल वाहून नेणारे आणि लायबेरियाचा ध्वज असलेले ‘शेनलाग सुएझमॅक्स’ हे तेलवाहू जहाज भारतात दाखल झाले आहे.

28 फेब्रुवारीला पश्चिम आशियात युद्धाला तोंड फुटले. त्यानंतर दुसर्‍याच दिवशी, म्हणजे 1 मार्च रोजी सौदी अरेबियातील रास तनुरा बंदरातून कच्चे तेल भरले गेले. तर, 3 मार्च रोजी हे जहाज भारताकडे मार्गस्थ झाले. सागरी ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले आहे की, जहाज 8 मार्च रोजी होर्मुझच्या सामुद्रधुनीत होते. त्यानंतर जहाजाची ट्रॅकिंग सिस्टीम तात्पुरती बंद झाली. तोपर्यंत होर्मुझ सामुद्रधुनी वाहतुकीसाठी उच्च जोखमीची झाली होती. या भागात प्रवास करताना जहाजाने त्याचे ‘ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टीम (एआयएस) ट्रान्सपाँडर’ बंद केले. त्यानंतर ही प्रणाली 9 मार्च रोजी सुरू झाल्याची दिसली. या प्रणालीमुळे इतर जहाजांना जवळच दुसरे जहाज असल्याची माहिती आपोआप कळते. या प्रणालीमुळे जहाजांची टक्कर टाळण्यास मदत होते. ही एक अनिवार्य सागरी ‘व्हीएचएफ’ रेडिओ प्रणाली आहे. त्यामुळे जहाज प्रवास सुरक्षित होतो. जहाजाची ओळख पटते. याशिवाय जहाजाचे नेमके स्थान, वेग याची माहिती जवळच्या जहाजांना आणि किनार्‍यावरील स्थानकांवर स्वयंचलितपणे प्रसारित केली जाते.

हेही वाचा –  ‘आपले सरकार सेवा केंद्रातील ब्लॉक व्यवस्थापकांचे प्रश्न सोडविण्यास शासन सकारात्मक’; ग्रामविकास राज्यमंत्री योगेश कदम

बुधवारी दुपारी 1 वाजता मुंबई बंदरात हे जहाज पोहोचले असून, सायंकाळी 6 वाजून 6 मिनिटांनी जवाहर द्वीप येथे जहाज नांगरण्यात आले. त्यात 1 लाख 35 हजार 335 टन कच्चे तेल आहे. पूर्व मुंबईतील माहुल येथील तेलशुद्धीकरण प्रकल्पांना हे तेल पुरविले जाईल. कच्चे तेल सोडण्याच्या प्रक्रियेला सुमारे 36 तास लागण्याची अपेक्षा आहे. हा टँकर शेनलाँग शिपिंग लिमिटेडच्या मालकीचा आहे आणि अथेन्सच्या डायनाकॉम टँकर मॅनेजमेंट लिमिटेडद्वारे व्यवस्थापित केला जातो. या जहाजात भारतीय, पाकिस्तानी आणि फिलिपाईन्स नागरिकांसह 29 क्रू मेंबर्स असून, या जहाजाचे नेतृत्व एका भारतीयाकडे आहे.

भारताच्या जहाजबांधणी मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सध्या पर्शियन आखाती प्रदेशात भारतीय ध्वज असलेली 28 जहाजे कार्यरत आहेत. त्यापैकी 24 जहाजे होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या पश्चिमेला असून, त्यात 677 भारतीय खलाशी आहेत. तर, चार जहाजे सामुद्रधुनीच्या पूर्वेला असून, त्यात 101 भारतीय खलाशी आहेत. या खलाशांच्या सुरक्षिततेबाबत बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून, जहाजबांधणी महासंचालनालयात 24 तास चालणारा नियंत्रण कक्ष कार्यरत आहे.

इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्डस् कॉर्प्स’च्या (आयआरजीसी) नौदल कमांडरने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून प्रवास करणार्‍या जहाजांना इराणची परवानगी घ्यावी लागेल; अन्यथा जहाज हल्ल्यांचे लक्ष्य बनू शकते, असा इशारा दिला होता. रिअर अ‍ॅडमिरल अलिरेझा तांगसिरी म्हणाले की, बुधवारी इराणच्या इशार्‍यांकडे दुर्लक्ष करणार्‍या दोन जहाजांना सामुद्रधुनीत लक्ष्य करण्यात आले आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button