एकनाथ शिंदेंचा ‘सायलेंट स्ट्राईक’ !
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा अचानक दिल्ली दौरा ; अधिवेशन मुंबईत, शिंदे दिल्लीत ; चर्चांना उधाण !
मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी पावसाळी अधिवेशन सोडून अचानक दिल्ली गाठल्यामुळे चर्चांना ऊत आला आहे. बुधवारी रात्री उशिरा एकनाथ शिंदे दिल्लीला पोहोचले आणि त्यांनी रात्री गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी तसेच राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांची गोपनीय भेट घेऊन प्रदीर्घ चर्चा केल्याचे ही सांगण्यात येते. त्यांच्या या ‘सायलेंट स्ट्राईक’ मुळे राजकीय वातावरण मात्र ढवळून निघाले आहे.
उलट-सुलट चर्चेला उधाण !
महाराष्ट्राच्या राजकारणातील एकनाथ शिंदे हे आधीच वादग्रस्त नेते आहेत आणि ते कोणत्याही क्षणी काहीही करू शकतात, असा त्यांच्या नावाभोवती दबदबा देखील आहे. मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरू असताना एकनाथ शिंदे यांनी दिल्ली का गाठले? याचे गौडबंगाल मात्र कायम आहे. शिंदे यांच्या सहकाऱ्यांनी किंवा विश्वासू कार्यकर्त्यांनी देखील याबाबत कमालीचे मौन बाळगले आहे.
अनेक राजकीय तर्क-वितर्क..
शिंदेंच्या या दौऱ्यामुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्क लढवले जात आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकनाथ शिंदे दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या आहेत. अधिवेशनाचा दुसरा आठवडा सुरू असून यात विविध महत्त्वाची विधेयके मांडली जाणार आहेत, त्याबाबत चर्चेसाठी ते गेले असावेत, असा एक सूर आहे.
देवेंद्र फडणवीस यांची नाराजी?
दुसरीकडे, शिंदेसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टीन चालकाला केलेल्या मारहाणीवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही नाराज असल्याचे बोलले जाते. विधान परिषदेत हा मुद्दा जेव्हा उपस्थित झाला, तेव्हा फडणवीसांनी सभापती आणि विधानसभा अध्यक्षांनी या प्रकाराची दखल घ्यावी आणि यावर काय कारवाई करायची त्याचा निर्णय घ्यावा, अशी शिफारस केली आहे.
उद्धव-राज ठाकरे बंधूंचे मनोमीलन..
दरम्यान, राज्यात उद्धव आणि राज ठाकरे बंधू एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यात हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकाच व्यासपीठावर आले. तब्बल १८ वर्षांनी हे दोन्ही बंधू एकत्र आल्याने राजकीय समीकरणेही बदलण्याची चर्चा सुरू झाली. त्यात, एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’ अशी घोषणा दिल्याने विरोधकांनी त्यांना धारेवर धरले, तो देखील मुद्दा आहे.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन
मीरा रोड येथील मोर्चाचा प्रकार..
मीरारोड येथे झालेल्या मराठी भाषिकांच्या मेळाव्याला पोलिसांनी परवानगी नाकारली. याठिकाणी पोलिसांच्या दबावाला न झुकता मराठी माणूस एकवटल्याचे चित्र दिसून आले. या मोर्चात शिंदेसेनेचे नेते मंत्री प्रताप सरनाईक गेले असता त्यांना आंदोलकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. सरनाईक यांना मराठी भाषिकांनी विरोध करताच त्यांना मोर्च्यातून काढता पाय घ्यावा लागला, हे महत्त्वाचे मुद्दे आहेतच.
ही तर फडणवीस यांचीच खेळी !
ठाकरे बंधू एकत्रित येण्या मागील खेळी देवेंद्र फडणवीस यांचीच असल्याचे माजी आमदार इम्तियाज जलील यांनी दावा केला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीआधी एकनाथ शिंदे यांना वरचढ होऊ द्यायचे नाही, त्यासाठी भाजपा प्रयत्न करत आहे, असे त्यांनी म्हटले आहे. मराठी विजयी मेळाव्यात राज ठाकरे यांनीही जे बाळासाहेबांना जमले नाही, ते देवेंद्र फडणवीस यांना जमले असा मार्मिक टोला लगावला होता. त्यामुळे राज्यात सुरू असणारा हिंदी विरुद्ध मराठी वाद यात सर्वाधिक कोंडी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झाल्याचे दिसून आले.
अजित पवार बोलून मोकळे झाले..
हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट पहिली ते पाचवी हिंदी नको, अशी स्पष्ट भूमिका घेतली होती. त्यामुळे बाळासाहेबांचे विचार आम्ही पुढे घेऊन चाललो आहोत, असे म्हणणाऱ्या शिंदेसेनेच्या नेत्यांनी हिंदी सक्तीवर ठाम भूमिका घेणे टाळले, अशी जनतेत चर्चा सुरू होती, याबाबतही चर्चा झाली असण्याची शक्यता आहे.
राज्यातील घडामोडींमुळे शिंदेंना महत्त्व..
राज्यातील एकंदर घडामोडी आणि राजकीय वातावरण या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यातच त्यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांना प्राप्तिकर विभागाने नोटीस बजावल्यामुळे एकनाथ शिंदे यांची ही धावपळ सुरू असल्याचे तर्कही काहींनी लढवले, तर मंत्री उदय सामंत म्हणाले, की आमची शिवसेना ही महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणारी आहे. त्यामुळे निधी आवश्यक असला की केंद्र सरकारकडे चर्चेसाठी आम्ही धाव घेतो. एकनाथ शिंदे यांचा हा दौरा महाराष्ट्राच्या भल्यासाठीच असेल, असे ते म्हणाले.
उबाठा गटाचा टोला : गुरुपौर्णिमा असल्याने गेले असावेत!
एकनाथ शिंदे यांच्या या अचानक दिल्ली दौऱ्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असतानाच उद्धव ठाकरे गटाने मात्र त्यांना चिमटा काढला आहे. त्यांचा पक्ष हा शाहासेना असल्यामुळे आणि गुरुपौर्णिमेचा दिवस असल्यामुळे गुरूंची भेट घेण्यासाठी एकनाथ शिंदे दिल्लीत पोहोचले असावेत. कदाचित, अनेक प्रकरणात त्यांच्याविषयी नकारात्मक गोष्टी दिल्ली पोहचल्या आहेत, त्यामुळे त्यांची कानउघाडणी करण्यासाठी त्यांना बोलावून घेतले असावे, अशी टीकाही उबाठा गटाने केली आहे.





