ताज्या घडामोडीलोकसंवाद - संपादकीय

मस्तवाल आमदाराकडून मारहाण, आमदार निवास कुणाकडे गहाण ?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची ख्याती एक मस्तवाल, मग्रूर, बेछूट आणि तोंडाला येईल ते बरळणारा आमदार अशी होऊ लागली आहे. राजकारणात एक मानसीकता असावी, मीडियाचे आपल्याकडे लक्ष जात नाही, कोपऱ्यात पडल्यासारखे, दुर्लक्षित होत असल्याचे लक्षात येताच सनसनाटी उडवून देणारे एखादे वक्तव्य करायचे आणि प्रसिद्धी मिळवायची..येन केन प्रकरेण प्रसिद्धीच्या झोकात राहणारी ही मानसीकता!

आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये मारहाण..

निकृष्ट अन्न दिले गेले म्हणून आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनमधील वेटरला बेदम मारतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. किती ओंगळवाणे आणि बीभत्स आहे हे..! स्वतः आमदार असताना आणि आमदार निवासातील कॅन्टीनवर आक्षेप असताना, त्यांना सहज कायदेशीर कारवाई करणे शक्य असताना समोरच्याला मारहाण करण्याचे कारणच काय ? पण, हल्ली हिंसेला प्रतिष्ठा मिळत चाललेली आहे. शिवाय आपण दबंगगिरी करत असल्याचेही लोकांना दाखवायचे आहे. त्यामध्ये चमकोगिरी पण आली आणि शायनिंग पण आले !

सोशल मीडियाला बातमी चालते..

आपल्या सोशल मीडियावरील लोकही सहज लिहून जातात.. चार लगावल्या पाहिजेत म्हणजे येतील ठिकाणावर ! मनात द्वेष, तिरस्कार, सततचा राग असला, की तो कुठल्याही कारणाने शब्दात किंवा प्रत्यक्ष कृतीत उतरतो. ‘हिंसा’ हे शस्त्र म्हणून वापरणारे आमदार मनातून पोखरलेले, अशांत असतात, मनाविरुद्ध काही घडले, की हे समोर पंचिंग बॅग असल्यासारखे त्याच्यावर चालून जातात. आपला सगळा राग हिंसेच्या माध्यमातून व्यक्त करतात, हे नक्की !

मारहाणीने प्रश्न सुटतात ?

हिंसा ही बेकायदेशीर, असंवैधानिक, नियमबाह्य असतेच असते वर हिंसेने प्रश्नही सुटत नाहीत. हिंसक कृतीने क्षणभर मनातील भावनेचा निचरा होतो बाकी काही नाही. एखाद्या प्रश्नावर काम करायचे तर अभ्यास, कृती आराखडा, सातत्य पूर्ण काम, संयम किती मेहनत असते. ज्यांना हे जमणार नसते ते कमकुवत लोक मारामारीवर उतरत असतात.

हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचे नियोजन

छत्रपतींविरोधातही वक्तव्य !

याच मस्तवाल संजय गायकवाड यांनी पंधरा दिवसांपूर्वी मराठी भाषेची महती सांगताना छत्रपती संभाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विषयी सुद्धा अनुद्गार काढले होते. छत्रपती शंभूराजांना १४-१४ भाषा येत होत्या, असे सांगून ते थांबले असते तर बरे ! पण त्यापुढे त्यांनी वापरलेली भाषा कोणत्याही आमदाराला शोभणारी नव्हती. अत्यंत खालच्या दर्जाचे उद्गार काढून सुद्धा संजय गायकवाड यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.. त्यांच्याकडे गांभीर्याने पाहायचे नाही, अशी समज विरोधकांना देण्यात आली, ही बाब जरा जास्तच गंभीर आहे !

म्हणे, सडलेले जेवण दिल्यामुळे संताप!

आमदार निवासात शिळे जेवण दिल्यामुळे आमदारांना संताप अनावर झाला, असे म्हणून त्यांनी समर्थन केले आहे. पण, टॉवेलमध्येच कॅन्टिनमध्ये आले, कर्मचाऱ्याला धू धू धुतले, हे संजय गायकवाड माध्यमांना सांगत बसले, याचा अर्थ काय घ्यायचा? त्यांनी जी मारहाण केली त्याचा व्हिडिओ काढला आणि तो व्हिडीओ देखील समोर आला आहे.

तेथे नेमके काय घडले ?

मुंबई स्थित आमदार निवासातील कॅन्टीनमध्ये संजय गायकवाड यांनी जेवणाची ऑर्डर दिली. त्यांना ऑर्डरप्रमाणे रूममध्ये जेवणही पुरवण्यात आले. मात्र, जेवणात देण्यात आलेली डाळ आणि भात हे शिळे होते आणि त्याचा सडलेला वास येत होता, असा आरोप करत संजय गायकवाड यांनी थेट आमदार निवासातील कॅन्टीन व्यवस्थापकाला धारेवर धरले. यापूर्वीही, मी कॅन्टीनमधील जेवणाची दोन ते तीन वेळा तक्रार केली असल्याचे गायकवाड यांनी सांगितले आणि सभागृहात हा मुद्दाम उचलणार असल्याची धमकीही दिली.

संजय गायकवाड काय म्हणाले?

आमदार निवासामध्ये डाळ-भात आणि पोळी असे जेवण मागवले होते. पहिला घास खाल्ला तर आंबट लागला आणि मला उलटीही झाली. त्यानंतर मी डाळीचा वास घेतला, तर भयंकर होता. त्यामुळे मी जाब विचारण्यासाठी कॅन्टिनमध्ये गेलो. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात लोक इथे येतात. तसेच याआधी देखील मी दोन-तीन वेळा त्यांना समज दिली होती. एका आमदाराला हे लोक जर विषारी जेवण देतात, मग सामान्य माणसांचं काय होत असेल?, असा सवाल संजय गायकवाड यांनी उपस्थित केला आहे.

कारवाई करा, सरळ होतील..

गायकवाड हे ज्या शिवसेना पक्षात आहेत, त्याचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी कारवाई केली तर त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांना धडा शिकवला जाईल. पण, त्यांच्याच पक्षातील संजय शिरसाट, भरत गोगावले, संतोष बांगर, संजय राठोड, गुलाबराव पाटील, अब्दुल सत्तार अशी मंडळी दररोज मुक्ताफळे उधळत असतील आणि त्यांच्यावर काहीच कारवाई होत नसेल, तर त्याला कोण जबाबदार ? एक तर या मंडळींना कोणाची तरी फूस असू शकते, किंवा काहीही बोलले, काहीही केले तरी चालू शकते, या घमेंडीत ही मंडळी वावरत असावीत. पण, जे काही चालले आहे ते एकनाथ शिंदे यांना म्हणजेच पर्यायाने ‘महायुती’ ला शोभणारे नाही, हे निश्चित !

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button