‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला

Eknath Shinde | अमरावती विमानतळाच्या उद्घाटनप्रसंगी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा ‘खुर्च्यांची अदलाबदल’ असा टोला लगावत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबतच्या सत्तेतील समीकरणांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरही जोरदार टीका केली.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, की आमच्या आधीच्या सरकारच्या काळात अनेक प्रकल्प व योजना बंद होत्या. मात्र आम्ही (महायुती) सत्तेत आलो आणि राज्याच्या विकासाचं, कल्याणकारी योजनांचं टेकऑफ झालं. मी त्या विमानाचा पायलट (वैमानिक) होतो. त्यावेळी देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे माझे को-पायलट (सह-वैमानिक) होते. आता देवेंद्र फडणवीस आमचे पायलट आहेत. मी व अजित पवार को-पायलट आहोत. केवळ आमची खुर्ची बदलली आहे. मात्र, विकासाचं विमान तेच आहे, इंजिनही तेच आहे. आता ते अधिक गतीने धावताना दिसतंय.
हेही वाचा : शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
आमच्या आधी सत्तेत असणाऱ्या लोकांना केवळ अडचणींचा पाढा तोंडपाठ होता. त्यांच्या काळात अनेक प्रकल्प रखडले होते. त्यांनी प्रत्येक ठिकाणी स्पीड ब्रेकर्स लावले होते. मात्र, आम्ही सत्तेत आल्यावर सगळे स्पीड ब्रेकर्स हटवले. आता आपल्याला बुलेट ट्रेनच्या वेगाने पुढे जायचं आहे. राज्यात आता अनेक प्रकल्प निर्माण होत आहेत. विमानतळामुळे अमरावतीचा विकास होतोय. या विमानतळामुळे नागरिक व शेतकऱ्यांचा मोठा फायदा होणार आहे, असंही एकनाथ शिंदे म्हणाले.