To The Point : कुदळवाडी अतिक्रमण कारवाई अन् बांगलादेशी-रोहिंग्या ‘कनेक्शन’ #Kudalwadi
पिंपरी-चिंचवडमधील कारवाईची भारतभरात चर्चा : राज्यातील भाजपा महायुती सरकारचा धाडसी निर्णय

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची काटेकोर अंमलबजावणी
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्रसह देशभरात घुसखोरी करुन राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांची संख्या वाढत चालली आहे. यामुळे महाराष्ट्रात घुसखोरी करुन राहणाऱ्या बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी सातत्याने केली जाते. मात्र, कुदळवाडी परिसरात झालेल्या कुदळवाडी अतिक्रमण विरोधी कारवाईनंतर बांगलादेशी-रोहिंग्यांचा मुद्दा महराष्ट्रभरात गाजला.
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने अनधिकृत बांधकामांवर फेब्रुवारी-२०२५ मध्ये मोठी कारवाई केली. देशाच्या इतिहासात ही रेकॉर्ड ब्रेक करावाई असल्याचे सांगितले जाते. कारण, तब्बल ८५० एकर क्षेत्रावरील अतिक्रमण प्रशासानाने हटवले आहे. राज्यातील सत्ताधारी भाजपा महायुती सरकार अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला धाडसी निर्णय आणि महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची काटेकोर अंमलबजावणी यामुळे गेल्या ४० वर्षांत निर्माण झालेला अनधिकृत ‘‘भंगार हब’’ अखेर जमीनदोस्त झाला.
या भागात भंगार व्यावसायिकांचे दुकाने होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आगीच्या घटना घडत होत्या. डिसेंबर- २०२४ मध्ये भीषण आग लागली. त्यामध्ये सुमारे ५ एकर क्षेत्रातील गोदामे खाक झाली होती. या घटनेचे पडसाद हिवाळी अधिवेशनात दिसले. त्यावेळी या क्षेत्राचे आमदार महेश लांडगे यांनी सभागृहात बोलताना ‘‘कुदळवाडी आणि परिसरात असलेल्या भंगार दुकानांमध्ये वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. यामध्ये घातपाताची शक्यता असून, या भागात बेकादेशीर वास्तव्य करणारे बांगलादेशी आणि रोहिंग्याचा वावर आहे.’’ असा दावा केला होता. त्यावर कारवाईची मागणीही केली होती.
आमदार लांडगे यांच्या मागणीला महायुती सरकारने आणि दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि महानगरपालिका प्रशासनाने ‘‘बुलडोझर’’ कारवाई सुरू केली. कुदळवाडीमधील अतिक्रमणग्रस्त परिसरत मुस्लिम बहुल होता. त्यामुळे हा समाज मोठ्याप्रमाणात रस्त्यावर आला आणि आंदोलन करण्यात आले. प्रकरण न्यायालयात गेले. न्यायालयाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार असेल, तर सरसकट कारवाई करण्याचे निर्देश दिले. या भीषण कारवाईमध्ये भूमिपुत्र आणि लघु उद्योजकांचेही नुकसान झाले.
संतजनांकडून कारवाईची मागणी…
जानेवारी- २०२५ मध्ये श्रीक्षेत्र आळंदी येथे संत संवाद कार्यक्रम झाला. त्याला प्रमुख उपस्थिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची होती. त्या ठिकाणी आळंदीमध्ये बांगलादेशी घुसखोर, रोहिंग्यांचे वास्तव्य आहे. त्यावर कारवाई करावी, अशी मागणी संतजन व वारकरी सांप्रदायातील लोकांनी केली होती. राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण हानी आणि इंद्रायणी प्रदूषण या मुद्यांवर बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा संबंध कुदळवाडी कारवाईशी जोडला गेला. किंबहुना, ‘‘कुदळवाडी आणि चिखलीला संतपरंपरा आहे. या भागात विशिष्ठ समाजाकडून दहशत आणि धर्मिक तेढ निर्माण होईल, असे प्राबल्य हेतुत: वाढवले जाते’’ असा दावा आमदार महेश लांडगे करतात. त्याला संत संवाद कार्यक्रमात पुष्टी मिळाली, असे दिसून येते.
कोण आहेत रोहिंग्या?
रोहिंग्या हे म्यानमारमधील एक मुस्लिम अल्पसंख्याक समुदाय आहे, ज्यांना म्यानमार सरकारनुसार ‘बंगाली’ म्हणून ओळखले जाते. म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणावर अत्याचार आणि हिंसा झाली, ज्यामुळे त्यांना त्यांच्या देशातून पळून जावे लागले. म्यानमारमध्ये हिंसा आणि अत्याचारांमुळे अनेक रोहिंग्यांनी बांगलादेशात आश्रय घेतला. बांगलादेशात रोहिंग्या निर्वासितांची संख्या खूप मोठी आहे आणि तेथे त्यांच्यासाठी निर्वासित छावण्या आहेत, जिथे ते राहतात. काही रोहिंग्या नागरिक भारत-बांगलादेश सीमेवरून भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतात, ज्यामुळे भारत सरकार राष्ट्रीय सुरक्षेबाबत सतर्क आणि गांभीर्याने घेत आहे.
पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षेचा प्रश्न… (कुदळवाडी)
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये २०२४ या वर्षभरात २९ बांगलादेशी घुसखोरांना आणि चार रोहिंग्यांना पिंपरी – चिंचवड पोलिसांनी अटक केली. या बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे पासपोर्ट रद्द करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी पाठपुरावा केला. यात गेल्या वर्षभरात ६२ पासपोर्ट रद्द झाले. यासह संबंधित बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचे आधार कार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्रदेखील रद्द होण्यासाठी पोलिसांनी पाठपुरावा केला. आतापर्यंत ७० हून अधिक बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना जेरबंद केल्याची नोंद पोलीस दप्तरी आहे. एव्हढेच नव्हे, अतिक्रमण कारवाईमध्ये एकही बांगलादेशी घुसखोर किंवा रोहिंग्या सापडला नाही, असा दावा शहरातील काही लोकांकडून केला जात होता. मात्र, याच महिन्यात बांगलादेशी दांम्पत्य बेकायदेशीरपण कुदळवाडीत वास्तव्य करीत असल्याचे समोर आहे. पिंपरी-चिंचवड शहराच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या हा विषय समोर आला.
पिंपरी-चिंचवड पोलिसांची सतर्कता… (कुदळवाडी)
पिंपरी – चिंचवड पोलिस आयुक्तालय हद्दीत म्हाळुंगे एमआयडीसी, निगडी, भोसरी, पिंपरी, भोसरी एमआयडीसी, सांगवी, दापोडी, चाकण, तळेगाव एमआयडीसी आणि देहूरोड या पोलिस ठाण्यांच्या परिसरात बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांना अटक केल्याची नोंद आहे. सर्वाधिक बांगलादेशी हे भोसरी परिसरातून अटक झाले आहेत. भोसरी परिसरात वर्षभरात १४ बांगलादेशींना बेड्या ठोकण्यात आल्या. हे सर्व बांगलादेशी बनावट कागदपत्रांद्वारे परिसरात राहत होते. आधार कार्ड, पॅन कार्ड यासह इतर कागदपत्र या बांगलादेशींकडून जप्त केली आहेत. पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालय स्तरावर दहशतवाद विरोधी शाखा कार्यरत आहे. या शाखेकडून घुसखोर, रोहिंग्यांच्या शोधासाठी मोहीम राबविण्यात येत आहे. संरक्षण विभाग, शासकीय व निमशासकीय आस्थापनांमधील कंत्राटी तसेच इतर कर्मचारी व कामगारांच्या कागदपत्रांची पडताळणी केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने काय उपाययोजना केली?
आता महाराष्ट्रात बांगलादेशी व रोहिंग्यांनी सुरु केलेल्या हैदोसावर बंदी घालण्यासाठी महाराष्ट्र सरकारने दमदार पाऊल उचलले आहे. जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात अभूतपूर्व बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे बांगलादेशी आणि रोहिंग्यांना सहजासहजी उपलब्ध होणारे बनावट प्रमाणपत्र रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. बनावट जन्म प्रमाणपत्र घेऊन अनेक बांगलादेशी व रोहिंगे हे महाराष्ट्रात राहत आहेत. त्यांना बंदी घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकाराने ऐतिहासिक निर्णय घेतला. महाराष्ट्र सरकारने जन्म मृत्यू नोंदणी अधिनियमात अभूतपूर्व बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार जन्म अथवा मृत्यू होऊन एक वर्षांपेक्षा अधिक कालावधी झाला असेल आणि त्यांच्या संबंधितांना ही प्रमाणपत्रे पाहिजे असतील, पण त्यासाठी जर सबळ पुरावे नसतील, तर अर्जदाराविरुद्ध थेट फौजदारी कारवाई केली जाणार आहे. कुदळवाडीच्या कारवाईमुळे प्रकाशझोतात आलेला बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्यांचा मुद्यावर भाजपाचे आमदार महेश लांडगे केंद्रबिंदू राहिले. राष्ट्रीय सुरक्षेच्या मुद्यावर त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. मात्र, या भूमिकेमुळे हिंदुत्ववादी किंवा मुस्लिमविरोधी अशी त्यांची प्रतिमा निर्माण झाली.