Breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

राज ठाकरे अन् एकनाथ शिंदेंच्या भेटीवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया, म्हणाले… ‘ते गँगचे लीडर’…

मुंबई : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी रात्री मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेट घेतली. विधानसभा निवडणुकीनंतर शिंदे आणि राज ठाकरेंची पहिल्यांदाच भेट झाली आहे. माहीम विधानसभा निवडणुकीमध्ये अमित ठाकरेंचा पराभव झाला होता.

त्यानंतर राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये राजकीय दुरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र दोघांच्याही झालेल्या या भेटीनंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंच्या भेटीची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे, त्यातच आता शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी या भेटीवर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

आदित्य ठाकरे म्हणाले, मी त्या भेटीवर जास्त बोलणार नाही, कारण मी त्यांना जास्त महत्त्व देत नाही. ते एसंशी गटाचे गँगचे लीडर आहेत, आज गावी जाणार आहेत. चंद्र आज कुठल्या दिशेत आहे माहित नाही पण त्यांचं नाराजीनाट्य सुरू झालेल आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांच्यावर आदित्य ठाकरेंनी जोरदार टीका केली. तसेच, नाराजी नाट्य सुरू झालं की मग गावी जाऊन प्रॅक्टिस करून येतात, असा टोलाही आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.

हेही वाचा –  ‘आम्ही फक्त पायलट-को-पायलट बदललो’; उपमुख्यमंत्री शिंदेंचा ‘खुर्ची’ वरून टोला

दरम्यान, राज ठाकरेंच्या भेटीनंतर प्रतिक्रिया देताना एकनाथ शिदेंनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. ते म्हणाले, सध्या निवडणुका नाहीत, त्यामुळे निवडणुकीचे वातावरण जेव्हा तयार होतं तेव्हाच युती, महायुतीची चर्चा होते. पण आज महायुतीबद्दलची कुठलीही चर्चा नव्हती. मुंबईतल्या रस्त्यांचं काम कुठपर्यंत आलंय या विकासाच्या गोष्टींवरही चर्चा झाली. ही केवळ सदिच्छा भेट होती. बाळासाहेबांच्या आठवणींना यावेळी मनमोकळेपणाने उजाळा दिला. त्यामुळे काही लपवून ठेवण्याचे काही कारण नाही, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणूक झाल्यापासून भेटण्याची, गप्पा मारण्याची दोघांचीही इच्छा होती. आज बाळासाहेबांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. आम्ही एकत्र काम केलं आहे. त्यामुळे जुन्या गोष्टींवर चर्चा झाली. त्यामुळे राजकीय अर्थ काढण्याची कोणतीही आवश्यकता नाही. तुम्हाला विश्वास बसणार नाही पण विश्वास ठेवा. आम्ही मोकळेपणाने बोलणारे लोक आहोत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button