#Maharashtra | विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अण्णा बनसोडे यांचा अर्ज दाखल

मुंबई | २६ मार्चला महाराष्ट्राच्या विधानसभेच्या उपाध्यक्षांची निवड होणार आहे, त्यासाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून अण्णा बनसोडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांच्यासोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री चंद्रकांत पाटील, उदय सामंत हे उपस्थित होते.
आमदार अण्णा बनसोडे यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड निश्चित मानली जात आहे. सत्ताधारी पक्षाचे २३६ इतके भक्कम संख्याबळ आणि त्याचवेळी विरोधकांचे केवळ ५२ आमदार विधानसभेत आहेत. हे लक्षात घेता विरोधी पक्षांकडून उपाध्यक्षपदासाठी निवडणूक लढविली जाण्याची शक्यता नाही.
हेही वाचा : #DishaSalian | दिशा सालियनला ओळखत होतात का? आदित्य ठाकरेंचं सडेतोड उत्तर, म्हणाले..
विधानसभेचे अध्यक्षपद (राहुल नार्वेकर) आणि विधान परिषदेचे सभापतीपद (राम शिंदे) हे भाजपकडे तर विधान परिषदेचे उपसभापतीपद (नीलम गोन्हे) हे शिंदेसेनेकडे आहे. त्यामुळे महायुतीत विधानसभेचे उपाध्यक्षपद अजित पवार गटाला देण्याचे निश्चित झाले आहे.
राज्य मंत्रिमंडळात अजित पवार गटाचे जे मंत्री आहेत त्यातील एकही अनुसूचित जातींचे नाहीत. त्यामुळे विधानसभेचे उपाध्यक्षपद बनसोडे यांना देऊन संतुलन साधण्याचा प्रयत्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे. नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर चार महिन्यांनी का होईना उपाध्यक्षपद भरले जाणार आहे.