“सत्यजीत तांबेंना जिंकवण्यासाठी अजित पवारांनी मदत केली?”; नाना पटोलेंची प्रतिक्रिया

राष्ट्रवादी काँग्रेसने शुभांगी पाटील यांना मदत केली असती, तर त्या निवडून आल्या असत्या
मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघात अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांचा विजय झाला. प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा पराभव झाला. या पार्श्वभूमीवर सत्यजित तांबे यांना निवडणूक जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनी मदत केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. यावरून आता काँग्रेस नेते नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवारांच्या विधानानंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता. त्यांनी, अजित पवार यांनी चांगला खुलासा केला आहे, की राष्ट्रवादी काँग्रेसने सत्यजीत तांबे यांना निवडून आणण्यासाठी मदत केली. अजित पवार ही एक जबाबदार व्यक्ती आहे. ते अशा पद्धतीने बोलत असतील तर या सगळ्या गोष्टीची चिंता आमच्याही मनात आहे. याबाबत महाविकास आघाडीची बैठक झाल्यानंतर याबाबत आम्ही खुलासा करू, असं म्हटलं आहे.
मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेचा आक्षेप नोंदवला नाही, पण अजित पवारांचं तसं विधान आहे. राष्ट्रवादीने सत्यजित तांबेंना निवडून आणण्यासाठी मदत केली. राष्ट्रवादी काँग्रेसने महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना मदत केली असती, तर त्या निवडून आल्या असत्या, असं विधान नाना पटोले यांनी केलं आहे.





