श्रीकांत शिंदेंच्या केंद्रीय मंत्रिपदाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा दावा; म्हणाले, “त्याचं कर्तृत्व…”

Eknath Shinde Shrikant Shinde Union Minister statement : आगामी केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर, ‘ऑपरेशन टायगर’ अंतर्गत केंद्र सरकारमध्ये शिवसेनेचे (एकनाथ शिंदे गट) महत्त्व वाढवून मंत्रिपद पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा राजकीय वर्तुळात केला जात आहे. तसेच, खासदार श्रीकांत शिंदे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळावी, म्हणूनच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हे ‘ऑपरेशन टायगर’ घडवून आणले, असाही आरोप होत आहे. शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त मुंबईतील गोरेगाव येथे आयोजित जाहीर मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या सर्व आरोपांवर सडेतोड भाष्य केले.
ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी श्रीकांत शिंदे यांना शिवसेनेचे ‘युवासेना प्रमुख’ पद देऊन पक्षाचे ‘राष्ट्रीय सरचिटणीस’ करावे, अशी जाहीर मागणी केली होती. या प्रस्तावाचा संदर्भ देत एकनाथ शिंदे म्हणाले, “रामदास भाई म्हणाले की आपण श्रीकांतला युवासेनेचे प्रमुख आणि राष्ट्रीय सरचिटणीस करू. पण जेव्हा मी याबाबत स्वतः श्रीकांतला विचारले, तेव्हा त्याने ‘आपण आपल्या इतर सर्वसामान्य कार्यकर्त्यांना पुढे करूया’, असे सांगत हे पद नम्रपणे नाकारले.”
हेही वाचा – ‘राज्यातील जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापनाचा अहवाल सहा महिन्यांत सादर करा’; मंत्री पंकजा मुंडे
केंद्रीय मंत्रिपदाबाबत स्पष्टीकरण देताना ते पुढे म्हणाले, “मंत्रिपदाबाबतही जेव्हा श्रीकांतला विचारण्यात आले, तेव्हा त्याने अत्यंत नम्रपणे नकार दिला होता. ही बाळासाहेबांची शिवसेना आहे. पण आता भाईंनी (रामदास कदम) हा प्रस्ताव मांडला आहे, त्यामुळे यावर पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी आणि तुम्ही सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून निर्णय घ्यायचा आहे. मी आपल्याला एवढेच सांगू इच्छितो की, केवळ आमदाराचा किंवा मुख्यमंत्र्याचा मुलगा आहे म्हणून कुणालाही सहज संधी मिळणार नाही. म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की ,आमदार मंत्र्याचा मुलगा आहे त्यामुळे त्याला संधी मिळणार असं नाही. त्याने काम केलं, त्याचं कर्तृत्व दाखवलं तर त्याच्यावर अन्याय करणार नाही. परंतु आमदार किंवा खासदार असणे हे आमचे ‘क्वालिफिकेशन’ ठरत नाही. मी स्वतः एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलगा असून या राज्याचा मुख्यमंत्री झालो आहे; कारण या प्रवासात मी प्रचंड संघर्ष आणि अनेक चढ-उतार पाहिले आहेत.”





