‘राज्यात गुन्हेगारी घटली, दोषसिद्धीचे प्रमाण वाढले’; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर : राज्यात ऑक्टोबर २०२४ च्या तुलनेत ऑक्टोबर २०२५ मध्ये गुन्ह्यांच्या संख्येत ७७११ ने म्हणजे २.५ टक्क्यांनी घट झाली असून दोषसिद्धीचे प्रमाण ९६.२४ टक्क्यांपर्यंत वाढले आहे. ४१ हजार १९३ लहान मुले व मुलींचा शोध घेवून त्यांना घरी पोचविण्यात आल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी विधानसभेत केले. मात्र बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये ३७५ ने वाढ झाली आहे.
विरोधकांच्या अंतिम आठवडा प्रस्तावाला सविस्तर उत्तर देताना राज्यातील गुन्हेगारी, सायबर गुन्हे व अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर आदी बाबींचा फडणवीस यांनी आढावा घेतला. खून, दरोडा, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये घट झाली असून नागरिकांना ११२ या क्रमांकावर प्रतिसाद देण्याचा वेळ १५ मिनीटांवरून ७.३७ मिनीटांपर्यंत खाली आला आहे.दोषसिद्धीचे प्रमाण २०१३ मध्ये ९ टक्के होते, ते नवीन कायद्यांच्या अंमलबजावणीमुळे ९६.२४ पर्यंत वाढले असून गंभीर गुन्ह्यांमध्ये ते ७० टक्के इतके आहे.
हेही वाचा – जनआंदोलनापुढे महापालिका नमली! तपोवन परिसरात 15 हजार वृक्षांच्या लागवडीचा निर्णय…
गेल्या ३ वर्षात ५१,२०७ पोलिसांची भरती झाली असून अजून २५ हजार पोलिसांच्या भरतीची प्रक्रिया सुरु आहे. अमली पदार्थविरोधी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. अमली पदार्थ विकणाऱ्यांवर एमपीडीए आणि मोक्का कायद्यानुसारही कारवाई करण्यात येत आहे. सायबर गुन्हेगारीचे वाढते प्रमाण लक्षात घेवून पोलिसांकडून या गुन्ह्यांचा छडा लावण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत आहे. देशातील सर्वात उत्तम सायबर प्रयोगशाळा राज्यात आहे आणि अन्य राज्ये व देशांशी राज्य पोलिसांचे सहकार्य घेत आहेत.





