देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रति लीटर दरवाढ करण्याचा निर्णय
केंद्र सरकारने उचलेले हे पाऊल पाहाता सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार

दिल्ली : सरकारने देशातील पेट्रोल आणि डिझेलवर एक्साईज ड्यूटीत २ रुपये प्रति लीटर दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.त्यामुळे राज्यातील पेट्रोल आणि डिझेलचे दरवाढ होणार आहे. वाढलेल्या एक्साईज ड्यूटीमुळे तेल कंपन्या या तेलाच्या दरात वाढ करण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ दरात लवकरच मोठी वाढ होण्याची शक्यता असून पेट्रोल-डीझेलचे नवे दर ८ एप्रिलपासून लागू होण्याची शक्यता आहे.
सध्या कच्च्या तेलाच्या आंतराष्ट्रीय किंमतीत अस्थिरता कायम आहे. अशात केंद्र सरकारने उचलेले हे पाऊल पाहाता सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार होणार आहे. खासकरुन जे रोज वाहनांनी प्रवास करतात. किंवा वाहतूक क्षेत्राशी संबंधित आहेत त्यांना या पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचा फटका बसणार आहे.
हेही वाचा – तनिषा भिसे प्रकरण: दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. घैसास यांचा राजीनामा
किती बसणार फटका
सोमवारी नवी दिल्लीत पेट्रोलची किंमत ९४.७२ रुपये प्रति लिटर असून मुंबईत पेट्रोलची किंमत ₹ १०४.२१ प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोलची किंमत प्रति लिटर ₹ १०३.९४ आहे. त्याच वेळी, चेन्नईमध्ये पेट्रोलची किंमत १००.७५ रुपये प्रति लिटर आहे. त्यामुळे आता या पेट्रोल आणि डिझेलच्या दरात तेलकंपन्या वाढ करणार असल्याने सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेल महाग मिळणार आहे.
एक्साईज डयूटी म्हणजे काय ?
पेट्रोल आणि डिझेलवर आकारला जाणारा उत्पादन शुल्क ( एक्साईज डयूटी ) हा केंद्र सरकारकडून आकारला जाणारा कर आहे, या करामुळे इंधनाचे दर मोठ्या प्रमाणात वाढत असतात. सध्या पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १९.९० रुपये आहे. डिझेलवरील उत्पादन शुल्क सुमारे १५.८० रुपये प्रति लिटर आहे. साल २०१४ मध्ये पेट्रोलवर उत्पादन शुल्क ९.४८ रुपये प्रति लिटर होते आणि डिझेलवर ते ३.५६ रुपये प्रति लिटर होते, ते नंतर अनेक वेळा वाढवण्यात आले. सोमवारी सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात प्रति लिटर २ रुपयांची वाढ केली. या आदेशात म्हटले आहे की पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १३ रुपये आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर १० रुपये वाढवण्यात आले आहे.
सामान्यांना फटका?
दुसरीकडे ,सरकारचा हा तर्क आहे की या दरवाढीने सरकारच्या तिजोरीत पैसे जमा झाल्याने आर्थिक स्थिती मजबूत होईल आणि इन्फ्रास्ट्रक्चर आणि अन्य विकास योजनांत पैसा ओतता येणार आहे. नुकतेच बजेटमध्ये केंद्र सरकारने मोठमोठे प्रकल्प जाहीर केले आहेत. त्यांना या दरवाढीतून पैसा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती स्थिर राहिल्यास त्याचा महागाईवरचा प्रभाव मर्यादित असतो, परंतु जर किंमती वाढल्या तर त्याचा महागाईवरही थेट परिणाम होऊ शकतो असे तज्ज्ञांचे मत आहे. सध्या,या निर्णयाने आता सर्वसामान्य लोकांना इंधन खर्चासाठी काही अतिरिक्त पैसे मोजावे लागणार आहेत.
जनतेवर भार पडणार नाही
केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील एक्साईज डयूटी वाढवले असले तरी, त्याचा ग्राहकांवर कोणताही परिणाम होणार नाही असा दावा सरकारने केला आहे. उत्पादन शुल्कात वाढ झाल्यानंतर सार्वजनिक क्षेत्रातील तेल व्यापार कंपन्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या किरकोळ किमती वाढवू नयेत असे सांगण्यात आले असल्याचे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने म्हटले आहे .