महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारचा झटका
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट आणि भरतशेठ गोगावलेअध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.

महाराष्ट्र : मंत्रिपदाचा लॉटरी लागूनही महामंडळावर मांड ठोकून बसलेल्या मंत्र्यांना महायुती सरकारने झटका दिला. सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांना अखेर सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. तर भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केलं जाणार असल्याचे समोर येत आहे. दरम्यान अध्यक्ष पदासाठी लागलीच आमदारांमध्ये लॉबिंग सुरू झाले आहे.
कॅबिनेट असतानाही अध्यक्ष पदाचा मोह
कॅबिनेट मंत्रीपद मिळाल्यानंतरही संजय शिरसाट हे अध्यक्षपदावर कायम होते. मागील महायुती सरकारमध्ये मंत्रीपद न मिळाल्यामुळे नाराजी दूर करण्यासाठी शिरसाट यांना सिडकोचं अध्यक्षपदी नियुक्ती केली होती. ते यापूर्वी शिंदे गटाची हिरारीने बाजू मांडत होते. पण अडीच वर्षांच्या कार्यकाळात त्यांची मंत्रिपदी वर्णी लागली नव्हती. त्यामुळे अखेरच्या टप्प्यात त्यांना सिडको अध्यक्ष पद देण्यात आले होते.
मंत्रीपदी निवड झाल्यानंतर संजय शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणे अपेक्षित होते. मंत्रिमंडळात वर्णी लागून महिना उलटून गेला तरी शिरसाट यांनी सिडकोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला नव्हता. उलट सिडको संचालक मंडळाच्या बैठका घेऊन त्यांनी निर्णयाचा सपाटा लावला होता.
ही बाब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निदर्शनास आली. त्यांनी त्यांना पदावरून मुक्त करण्याचे निर्देश नगरविकास विभागाला दिले होते. गुरूवारी शासन निर्णयात शिरसाट यांना मंत्रीपद मिळाल्यानंतर नियमानुसार सिडकोच्या अध्यक्षपदाचा कार्यभार संपुष्टात आला असल्याची माहिती देण्यात आली. सिडकोच्या आर्टिकल ऑफ असोसिएशनमधील 202 कलमान्वये प्रदान अधिकाराआधारे शिरसाट यांची मंत्री पदी नियुक्ती करण्यात आली असल्याने त्यांना पदमुक्त करत असल्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यांना सिडकोच्या अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले.
अध्यक्ष पदासाठी आमदारांमध्ये लॉबिंग
भरतशेठ गोगावले यांनाही लवकरच एसटी महामंडळाच्या अध्यक्ष पदावरून मुक्त केलं जाणार असल्याचे समोर येत आहे. इतर ही महामंडळाच्या अध्यक्ष पदासाठी नियुक्ती करण्यात येणार आहे. दरम्यान लवकरच आता नवीन सिडको अध्यक्षाची निवड केली जाईल. सिडकोचे अध्यक्षपदासाठीही आता मोठ्या प्रमाणात लॉबिंग सुरू झाले आहे. नवी मुंबईतील आमदार आणि इतरांनी या पदासाठी फिल्डिंग लावल्याचे समजते. आता सिडकोचे अध्यक्ष पद कुणाला मिळते याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे सिडकोचा तांत्रिक कारभार सुधारावा. नागरिकांच्या जलदगतीने सोडवाव्यात आणि ऑनलाईन पद्धतीने कारभार करावा. लीज होल्डसंदर्भात अनुरूप निर्णय घ्यावेत, अशी अपेक्षा सिडको वसाहतीतील नागरीक करत आहेत.