‘‘महाईन्यूज’’ च्या वृत्तावर शिक्कामोर्तब। स्वीकृत सदस्यपदी पराभूत उमेदवारांना संधी नाही !
कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील : पुणे- पिंपरी-चिंचवड महापालिकेतील स्वीकृत सदस्य वाटपाचा ‘‘फार्म्युला’’ ठरला!
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी
सुमारे ३५ लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवड शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने आता सत्तास्थापन केली आहे. महापालिकेतील नगरसेवकांची एकूण संख्या १२८ असून, त्यापैकी ८४ जागा भाजपाने जिंकल्या आहेत. प्रत्येक १२ नगरसेवकांमागे एक स्वीकृत नगरसेवक या सूत्रानुसार भाजपाच्या वाट्याला ७ स्वीकृत सदस्य येत आहेत. त्यासाठी इच्छुकांनी ‘‘गल्लीपासून अगदी दिल्लीपर्यंत फिल्डिंग’’ लावली आहे. याबाबत दि. ७ फेब्रुवारी २०२६ रोजी ‘‘महाईन्यूज’’ ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तावर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिक्कामोर्तब केले आहे.
PCMC: स्वीकृत नगरसेवक पदासाठी भाजपाचा ‘‘फॉर्म्युला’’ ठरला! अशा मथळ्याने वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. आता या वृत्ताला चंद्रकांत पाटील यांनी दुजोरा दिला. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीनंतर आता स्थायी समिती, इतर समित्या आणि विशेषतः भाजपच्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक कोण होणार? याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. अशात उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महत्त्वाचे विधान केले आहे. यामुळे स्वीकृत सदस्यपदासाठी अनेक इच्छुकांच्या आशा मावळल्या आहेत.
महापालिका निवडणुकीत पराभूत झालेल्या कोणत्याही उमेदवाराला स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी मिळणार नाही. स्वीकृत सदस्यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी नव्हे, तर केवळ अडीच वर्षांसाठी केली जाणार आहे. यामुळे सुमारे 14 कार्यकर्त्यांना ही संधी मिळेल. मात्र, निवडणुकीत उमेदवारी मिळाली नव्हती आणि जे गेल्या अनेक वर्षांपासून पक्षासाठी संघटनात्मक काम करत आहेत, अशा कार्यकर्त्यांना प्राधान्य दिले जाईल.
– चंद्रकांत पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री.





