‘संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’; चित्रा वाघ यांची टीका

मुंबई : संजय राऊत जेलमध्ये गेल्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे. तसेच त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे.
चित्रा वाघ म्हणाल्या, संजय राऊत हे १०३ दिवस जेलमध्ये राहून आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे आणि त्या मानसिकतेतून ते बोलत असतात. महाराष्ट्रातील आमचे सरकार हे फेसबुक लाईव्हचे सरकार नसून लोकांच्या दारी जाऊन त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणारे सरकार आहे.
हेही वाचा – Ganesh Utsav 2023 : गणेशोत्सवासाठी PMPML च्या बसेस रात्रभर धावणार
उद्धव ठाकरे यांना आपण विदूषकचे कपडे पाठविले होते असं विचारता चित्रा वाघ म्हणाल्या, आमच्या नेत्यांवर वैयक्तिक टीका कराल तर, अभी तो पिक्चर बहोत बाकी है. एखाद्या नेत्याच्या शरीरयष्टीवरून टीका करणे हे उद्धव ठाकरे यांना शोभत नाही. उद्धव ठाकरे हे आमच्या नेत्यांच्या टीवल्या-बावल्या करतात आणि लोकांना हसवतात आणि हसवण्याचे काम हे विदूषक करतात. म्हणून उद्धव ठाकरे यांना विदूषकचे कपडे आम्ही पाठवले.
राज्यावर ४० वर्षं मराठी नेते राज्य करत होते. त्यावेळी कुणी मराठ्यांना आरक्षण दिलं नाही. मराठ्यांना आरक्षण मिळायला हवा ही सरकारची भूमिका आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपाच्या पाठीमध्ये खंजीर खुपसून राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केली. त्या अडीच वर्षांत उच्च न्यायालयात हे आरक्षण टिकवू शकलेले नाहीत, असंही चित्रा वाघ म्हणाल्या.





