टर्किश दागिन्यांच्या बाबतीत भारतीयांचा महत्त्वाचा निर्णय
ज्वेलर्सचाही तुर्कीवर स्ट्राइक

महाराष्ट्र : भारत-पाकिस्तानदरम्यान संघर्ष सुरू असताना तुर्कीने पाकिस्तानची मदत केली होती. एकीकडे भारत पाकिस्तानातील दहशतवादाविरोधात लढत असताना पाकिस्तानला चिथावणी मिळेल असं कृत्य तुर्की आणि अझरबैजान या देशांनी केलं होतं. त्यानंतर भारतीयांच्या मनात तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांबद्दल तीव्र संताप आहे. या संतापातूनच आधी तुर्कीच्या सफरचंदांवर बहिष्कार टाकण्यात आला होता. त्यानंतर तुर्की आणि अझरबैजान या दोन्ही देशांच्या टूरिझमवर बहिष्कार टाकण्याचा ट्रेंड सुरू झाला होता. आता टर्किश दागिन्यांच्या बाबतीत भारतीयांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
भारतात गेल्या काही वर्षांत टर्किश ज्वेलरीची मागणी वाढली होती. परंतु भारत-पाकिस्तान तणावाच्या स्थितीत तुर्कीने पाकिस्तानला मदत केल्याने आता भारतात त्यांच्या ज्वेलरीचं नावच बदलण्यात आलं आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानातील दहशवाद्यांविरोधात राबवलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’च्या पार्श्वभूमीवर आता टर्किश ज्वेलरीचं नाव आता ‘सिंदूर’ ज्वेलरी करण्यात आलं आहे. नाव बदलण्याचा हा निर्णय ज्वेलर्सच्या देशातील शिखर संघटना जेम्स अँड ज्वेलरी डोमेस्टिक काऊन्सिलने घेतलाय. त्यानुसार टर्किश ज्वेलरी आता भारतात ‘सिंदूर ज्वेलरी’ नावाने ओळखण्यात येणार आहे. या संबंधीचा ठरावदेखील संमत करण्यात आल्याची माहिती ‘जेम्स अँड ज्वेलरी काऊन्सिल’चे चेअरमन राजेश रोकडे यांनी दिली.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवड | नामवंत व्यावसायिक अशोक पारळकर यांचे निधन
टर्किश ज्वेलरी ही दागिन्यांच्या प्रीमियम रेंजमध्ये येते. याशिवाय तुर्कीवरून होणारी टर्किश दागिन्यांची आवकही बंद केली असून, आता या प्रकारची ज्वेलरी भारतात बनवली जाणार आहे. पाकिस्तानला पाठिंबा दिल्यामुळे तुर्कीसोबतचा व्यापार थांबवावा यासाठी जीजेसीने ज्वेलर्सना आवाहन केलं होतं. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. टर्किश ज्वेलरी हे नाव प्रीमियम दागिन्यांच्या विस्तृत श्रेणीसाठी वापरलं जात होतं. कारण अशा दागिन्यांच्या डिझाइन्स या तुर्कीतून आल्या होत्या. भारतीय ज्वेलर्सकडूनच आता तसे दागिने बनवले जात असल्याने गेल्या काही वर्षांत त्यांच्या आयातीत लक्षणीय घट झाली आहे.
या दागिन्यांच्या प्रीमियम मूल्यासाठी टर्किश या ब्रँड नावाने त्यांची विक्री करण्यात यायची. परंतु आता हे नावदेखील वापरलं जाणार नाही, असं रोकडे म्हणाले. तुर्कीसोबतचा व्यापार थांबवून आम्ही एकता आणि दृढनिश्चयाचा स्पष्ट संदेश देतोय, असं रोकडे यांनी सांगितलं. दागिन्यांची आयात थांबली असली तरी ज्वेलर्स तुर्कीमधून यंत्रसामग्री खरेदी करत होते. आता तुर्की उपकरणांवरही बहिष्कार टाकण्याचं आवाहन करण्यात आलं आहे, असं जीजेसीच्या दुसऱ्या सदस्याने सांगितलं.