चऱ्होली भाजपाच्या ‘आप्पांचा’ बालेकिल्ला; शिवसेनेच्या ‘भाऊं’साठी वर्चस्वाची लढाई!
ग्राऊंड रिपोर्ट: प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपा-राष्ट्रवादी- शिवसेना लढत
पिंपरी-चिंचवड । अविनाश आदक । पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025 ची प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली. ऑक्टोबरमध्ये हरकती आणि सूचनांची सुनावणी होईल आणि सदरची प्रभाग रचना अंतिम केली जाणार आहे. त्यानंतर आरक्षण सोडत आणि निवडणूक आचारसंहिता सुरू होईल. डिसेंबरमध्ये मतदान आणि जानेवारी-2026 मध्ये महानगरपालिकेत नवीन महापौर विराजमान होतील. या निमित्ताने ‘‘महाईन्यूज’’ च्या माध्यमातून प्रभागनिहाय राजकीय स्थितीबाबत विश्लेषण पहिला ‘‘ग्राऊंड रिपोर्ट’’ प्रसिद्ध करीत आहोत. चऱ्होली भाजपाच्या ‘आप्पांचा’ बालेकिल्ला; शिवसेनेच्या ‘भाऊं’साठी वर्चस्वाची लढाई!, अशी स्थिती आहे.
2017 च्या निवडणुकीप्रमाणे प्रभाग ‘‘रचना जैसे थे’’ आहे. प्रभाग क्रमांक २ मध्ये कोणताही बदल नाही. ज्याअर्थी 2017 प्रमाणे प्रभाग निश्चित झाले आहेत. त्यासाठी 2011 ची जनगनना ग्रहीत धरण्यात आली आहे. तत्कालीन जनगननेनुसार, प्रभागाची लोकसंख्या 51 हजार 628 इतकी दर्शवण्यात आली आहे. त्यापैकी 6 हजार 828 इतकी अनुसूचित जाती आणि 1 हजार 75 इतकी अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे.
लोकसंख्येच्या प्रमाणानुसार, 2017 मध्ये या प्रभागामध्ये भाजपाची मोठी लाट होती. या प्रभागातून भाजपाचे तीन आणि राष्ट्रवादीचा एक उमेदवार निवडून आले होते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या इतिहासातील भाजपाचे पहिले महापौर म्हणून ज्यांना ओळख मिळाली. ते नितीन काळजे या प्रभागातून प्रतिनिधीत्व करतात. या प्रभागातून भाजपाच्या शैला मोळक यांना गत निवडणुकीत पराभव पत्कारावा लागला होता.
नितीन काळजे यांनी 10 हजार 593 मते मिळवत, शिवसेनेच्या धनंजय आल्हाट यांचा पराभव केला होता. आल्हाट आता शिवसेना ठाकरे गटात आहेत. सुवर्णा बुर्डे यांनी ब गटातून 10 हजार 335 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या मंदा आल्हाट यांचा पराभव केला होता. तसेच, राष्ट्रवादीच्या विनया तापकीर यांनी क- गटातून भाजपाच्या शैला मोळक यांचा पराभव केला होता. त्यांनी 8 हजार 389 मते घेतली होती. ड- गटातून सर्वसाधारण जागेसाठी भाजपाकडून लक्ष्मण सस्ते यांनी निवडणूक लढवली होती. त्यांनी 9 हजार 183 मते मिळवत, राष्ट्रवादीच्या संजय पठारे यांचा (7 हजार 551) पराभव केला होता.
भाजपाचे विद्यमान आमदार महेश लांडगे यांचे एकेकाळी कट्टर समर्थक असलेले लक्ष्मण सस्ते यांनी 2022 च्या महापालिका निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर भाजपाने या ठिकाणी दुसऱ्या फळीतील उमेदवारांना मोठी ताकद दिली आहे.
2017 च्या आरक्षणानुसार, अ- नागरिकांचा मागास प्रवर्ग, ब- सर्वसाधारण महिला, क- सर्वसाधारण महिला आणि ड- सर्वसाधारण असे आरक्षण होते. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला 50 टक्के आरक्षण आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार, ओबीसी आरक्षण पूर्ववत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे आरक्षणामध्ये काही फार बदल होईल, असे चित्र नाही
विकासकामांच्या जोरावर भाजपाच्या प्रभागातील चारही जागा निवडून येतील. समाविष्ट गावांचा भाजपामुळे कायापालट झाला आहे. माझ्या कार्यकाळात सुमारे 52 किलोमीटरचे रस्ते झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत या प्रभागातून आमदार महेश लांडगे यांना सुमारे 12 हजार मतांचे लीड मिळाले होते. त्याची पुनरावृत्ती आता महापालिका निवडणुकीत होईल.
– नितीन काळजे, माजी महापौर.
प्रशासक काळातील 3 वर्षांत नगरसेवकांना लोक विसरले आहेत. विद्यमान लोकांकडे फिरकले नाही. माजी झाले तरी नगरसेवक तेच आहेत, अशी लोकांची भावना होती. नागरी सुविधांच्या बाबतील प्रचंड अनास्था आहे. भोसरीतील संत ज्ञानेश्वरनगरचा भाग प्रभागाला जोडला आहे. त्यामुळे त्या भागातील लोकांवर अन्याय होतो आहे.
– धनंजय आल्हाट, शिवसेना उबाठा.







