महाराष्ट्रात शेतकरी कर्जमाफी होणार, पण सरसकट नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांचं सूचक वक्तव्य

मुंबई | महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकरी कर्जमाफीबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राज्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल, पण ती सरसकट नसेल. केवळ गरजू आणि पात्र शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल, असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं.
सरसकट कर्जमाफी होणार नाही. फक्त गरजूंसाठी होईल, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत. तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला? असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार, राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाफी करण्याच्या तयारीत आहे. त्यासाठी निकष नेमके काय असतील? ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
हेही वाचा : ‘गणेश नाईकांनी लॉटरी शब्द वापरला, त्यांच्या डोक्यात मटका असेल’; राऊतांचा शिंदेंना टोला
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधीमंडळात घोषणा केली की, महाराष्ट्रातल्या अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे ज्यांना खरी कर्जमाफीची गरज आहे. म्हणून ती कर्जमाफी कशी असावी? एखादा व्यक्ती शेतात बंगला बांधतो, फार्म हाऊस बांधतो, तो कर्ज उचलतो. त्याला कशाला शेतकऱ्यांची कर्जमाफी पाहिजे? असा सवाल बावनकुळे यांनी केला.
ज्या गरीब माणसाच्या शेतात काहीच पिकत नाही. ज्याने कर्ज उचललं आहे, जो आत्महत्या सारखं टोकाचं पाऊल उचलायला निघाला आहे, अशा व्यक्तीगत सर्वेक्षण करुन कर्जमाफी केली पाहिजे याकरता आपण पुढे काम करण्याचा प्रयत्न करतोय, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





