‘२०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील’; भाजप नेत्याचं विधान

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आगामी २०२४ च्या विधानसभा निवडणुकीवर बोलताना मोठं विधान केलं आहे. २०२४ ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले. बावनकुळेंच्या या वक्तव्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
भंडाऱ्यातील लाखनी इथे भाजपकडून दिवाळी मिलन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी २०२४ च्या नोव्हेंबर महिन्यात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर कोण शपथ घेणार? असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांना विचारला. तेव्हा कार्यकर्त्यांनी देवेंद्र फडणवीस यांचं नाव घेतलं. यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील, असा संकल्प करण्यात आला.
हेही वाचा – ‘निवडणुकीतल्या पराभवाचा राग अधिवेशनात काढू नका’; पंतप्रधान मोदींचा विरोधकांना टोला
चंद्रशेखर बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
मे महिन्यात देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा शपथ घेतील. त्यासाठी महाराष्ट्रातून ४५ खासदार निवडून पाठवायचे. भंडाऱ्यातील खासदार हा सर्वाधिक मतांनी निवडून पाठवायचा आहे. दुसरा संकल्प वानखेडे स्टेडियमवर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. त्यासाठी आपण सर्वांनी ताकद लावायची. आपले उमेदवार चांगल्या मतांनी निवडून आणायचे, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.





