भाजपा स्वीकृत नगरसेवक पदांसाठी भाजपची नवी अट : एसआयआर अन् संघटनात्मक कामगिरीची होणार कसोटी!
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांचे स्पष्ट संकेत : इच्छुकांच्या कामगिरीचे प्रदेश पातळीवर मूल्यांकन
पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी । राज्यातील भाजपा आमदार आणि खासदारांच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोशल मीडिया, जनसंपर्क आणि संघटनात्मक कामकाजाबाबत काही लोकप्रतिनिधींची कानउघाडणी केली. त्याची राज्यभरात चर्चा झाली. विशेष म्हणजे, आता पिंपरी-चिंचवड शहर भाजपामध्ये प्रदेशाचा ‘पॅटर्न’ राबवला जाणार आहे. आगामी काळात महापालिका सभागृहात नियुक्त होणारे ७ स्वीकृत नगरसेवक आणि ३० प्रभाग समिती सदस्य निवडताना संघटनात्मक कार्य, सोशल मीडियावरील सक्रियता आणि विशेषतः एसआयआर (SIR) मोहिमेतील योगदान महत्त्वाचे निकष ठरणार आहेत, असे स्पष्ट संकेत शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिका सभागृहात भारतीय जनता पक्षाकडून एकूण ७ स्वीकृत नगरसेवक आणि ३० प्रभाग समिती सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर इच्छुकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून पक्षांतर्गत हालचालींना वेग आला आहे.
दरम्यान, भारतीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या ‘एसआयआर’ मोहिमेला भाजपाने प्राधान्य दिले आहे. मतदार यादीतील मृत, स्थलांतरित, दुबार किंवा अपात्र मतदारांची नावे वगळणे आणि पात्र मतदारांची नव्याने नोंदणी करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. मतदार यादी निर्दोष करून निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि निष्पक्ष करण्यासाठी पक्ष संघटना सक्रिय झाली आहे.
भाजपा शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे यांनी पक्षाच्या बैठकीत याबाबत स्पष्ट संकेत दिले आहेत. किंबहुना, भविष्यातील निवडणुकांमध्ये संधी मिळण्यासाठी ही कामगिरी प्रत्येकाला दाखवावी लागेल, असे म्हटले आहे. स्वीकृत नगरसेवक किंवा प्रभाग समिती सदस्यपदाची अपेक्षा असेल, तर एसआयआर मोहिमेत दिलेले ‘लक्ष्य’ पूर्ण करणे आवश्यक राहणार आहे. केवळ इच्छुक असल्याने संधी मिळणार नसून, पक्षाने दिलेल्या जबाबदाऱ्यांचे पालन आणि प्रत्यक्ष कामगिरी याचा आढावा घेतला जाणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, इच्छुकांनी ‘एसआयआर’ मोहिमेतील सक्रीय सहभाग, मतदार नोंदणी आणि पडताळणीचे काम, सोशल मीडियावरील पक्षाच्या भूमिका व योजनांचा प्रसार, तसेच संघटनात्मक उपक्रमांमधील सहभाग यांचा सविस्तर अहवाल सादर करावा लागणार आहे. या अहवालाच्या आधारेच संबंधित व्यक्तींच्या कामाचे मूल्यमापन होणार असल्याची चर्चा पक्ष वर्तुळात सुरू आहे. यामुळे स्वीकृत नगरसेवक आणि प्रभाग समिती सदस्यपदासाठी इच्छुक असलेल्या कार्यकर्त्यांसमोर आता केवळ राजकीय इच्छाशक्ती नव्हे, तर संघटनात्मक कामगिरी सिद्ध करण्याचे आव्हान उभे राहिले आहे. आगामी नियुक्त्यांमध्ये कोण बाजी मारणार याकडे भाजप कार्यकर्त्यांसह शहराच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
महापालिकेत भारतीय जनता पार्टीच्या नगरसेवकांची संख्या ८४ आहे. त्यामध्ये विविध समिती आणि मानाच्या पदांवर संधी देताना प्रदेश नेतृत्त्व एसआयआर आणि संघटनात्मक कार्याचा अहवाल तपासणार आहे. त्यासाठी इच्छुकांना काम दाखवावे लागणार आहे, असेही विश्वसनीय सुत्रांनी सांगितले.
“भारतीय जनता पक्षात पदे मागून मिळत नाहीत, तर कामाच्या जोरावर मिळतात. ‘एसआयआर’ मोहिमेत ज्यांनी घराघरात जाऊन मतदारांपर्यंत पोहोचण्याचे काम केले, पक्षाची भूमिका प्रभावीपणे मांडली आणि संघटन मजबूत करण्यासाठी योगदान दिले, त्यांनाच संधी मिळेल. पिंपरी, चिंचवड आणि भोसरी अशा तिनही विधानसभा क्षेत्रांमध्ये ‘एसआयआर’ चे काम प्रभावीपणे झाले पाहिजे, अशा प्रदेश कार्यालयातून सूचना आहेत. केवळ इच्छुक असल्याने स्वीकृत नगरसेवक किंवा प्रभाग समिती सदस्यपद मिळणार नाही. प्रत्येकाच्या कामाचे मूल्यांकन केले जाईल आणि कामगिरीच्या आधारेच निर्णय होईल. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या सर्व प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत.
– शत्रुघ्न काटे, शहराध्यक्ष, भाजपा, पिंपरी-चिंचवड,पुणे.





