Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारणलेख

संपादकीय : पिंपरी-चिंचवडच्या पाण्यासाठी आता आमदार महेश लांडगेच ‘‘आशेचा किरण’’!

पिंपरी | पिंपरी-चिंचवड शहराच्या पाणीप्रश्नावर गेल्या अनेक वर्षांपासून चर्चा, बैठका, आश्वासने आणि प्रस्तावांची रेलचेल सुरू आहे. मात्र, प्रत्यक्षात शहराला कायमस्वरूपी दिलासा देणारे प्रकल्प अद्यापही पूर्णत्वास गेलेले नाहीत. त्यामध्ये सर्वाधिक महत्त्वाचा आणि तितकाच दुर्लक्षित ठरलेला प्रकल्प म्हणजे पवना बंदिस्त जलवाहिनी योजना.

तब्बल १५ वर्षांपूर्वी प्रस्तावित झालेला हा प्रकल्प आजही कागदोपत्रीच आहे. दरम्यानच्या काळात शहराची लोकसंख्या दुप्पट झाली, पाण्याची मागणी प्रचंड वाढली, पण प्रकल्पाचा वेग मात्र शून्यच राहिला. ४०० कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रकल्प आता १२०० कोटी रुपयांवर पोहोचला आहे. ही वाढलेली किंमत केवळ आर्थिक नुकसान नाही, तर प्रशासनाच्या निष्क्रियतेची आणि राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाची साक्ष आहे.

आज पिंपरी-चिंचवडची संपूर्ण भिस्त जवळपास पवना धरणावरच आहे. पावसाने ओढ दिली की पाणी कपात अपरिहार्य ठरते. अशा परिस्थितीत बंदिस्त जलवाहिनी हा केवळ विकास प्रकल्प नसून शहराच्या जलसुरक्षेचा पाया आहे. त्यामुळे हा प्रकल्प आता आणखी रखडणे शहराच्या भवितव्यासाठी घातक ठरू शकते.

याच पार्श्वभूमीवर आमदार महेश लांडगे यांची भूमिका महत्त्वाची ठरते. कारण, पाणीप्रश्नांबाबत केवळ निवेदने देण्यापेक्षा प्रत्यक्ष परिणाम घडवून आणण्याचा त्यांचा अनुभव आहे. भामा-आसखेड योजनेला गती देणे असो किंवा आंद्रा धरणातून अतिरिक्त पाणी आरक्षणासाठी शासनदरबारी सातत्याने पाठपुरावा करणे असो, लांडगे यांनी पाणीप्रश्नावर आक्रमक आणि परिणामकारक भूमिका घेतल्याचे दिसून आले आहे. शहरातील शास्तीकर सरसकट माफी, मोशी कचरा डेपोवरील बफर झोन कमी करणे, प्राधिकरण बाधितांचा परतावा मिळवून देणे, समाविष्ट गावांचा विकास असे महत्त्वाचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्याचे श्रेय लांडगे यांना जाते.

हेही वाचा

भोसरीतील गवळी माथा SRA प्रकल्पात गोलमाल? १४ वर्षे रखडलेला प्रकल्प वर्षभरात मार्गी!

विशेष म्हणजे, पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या संदर्भात त्यांनी महापालिका आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठका घेऊन प्रकल्पाचा आढावा सुरू केला आहे. शासनाकडून निधी, आवश्यक मंजुऱ्या आणि अडथळे दूर करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे अनेक वर्षे थंडबस्त्यात गेलेल्या या प्रकल्पाला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील आमदार म्हणून लांडगे यांची ओळख आहे. खरं तर मध्यंतरी एका रोड शोमध्ये ‘‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महेश लांडगेंसाठी ‘बेरर चेक’ आहे..’’ असे जाहीर वक्तव्य स्वत: मुख्यमंत्र्यांनी केले होते. त्यामुळे लांडगेच हा प्रश्न मार्गी लावू शकतात, अशी अपेक्षा पिंपरी-चिंचवडकरांना आहे.

खरे तर हा प्रकल्प कोणत्या पक्षाचा किंवा कोणत्या नेत्याचा नाही; तो पिंपरी-चिंचवडच्या भविष्यातील लाखो नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याशी संबंधित आहे. मात्र, आजच्या घडीला या प्रकल्पाला राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर गती देऊ शकेल असे नेतृत्व शोधायचे झाल्यास महेश लांडगे हेच सर्वाधिक प्रभावी नाव पुढे येते. म्हणूनच पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आता केवळ चर्चा नव्हे, तर निर्णायक नेतृत्वाची गरज आहे. आणि शहराच्या पाणीप्रश्नाचा इतिहास पाहता, “पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आता आमदार महेश लांडगे यांच्याशिवाय पर्याय नाही,” अशी भावना नागरिकांमध्ये निर्माण होणे स्वाभाविक आहे.

पिंपरी-चिंचवडच्या जलसुरक्षेची लढाई आता निर्णायक टप्प्यावर आहे. पुढील काही महिने या प्रकल्पाचे भविष्य ठरवतील आणि त्यात महेश लांडगे यांची भूमिका केंद्रस्थानी असेल, यात शंका नाही.

– अविनाश आदक, मुख्य संपादक, महाईन्यूज.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा 

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button