“भाजपचं ‘सत्तेतून पैसा, पैशातून सत्ता’ समीकरण …” ; विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Vijay Wadettiwar : नागपूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असताना काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार विजय वडेट्टीवार यांनी भाजपवर थेट आरोप करत जोरदार हल्लाबोल केला आहे. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना वडेट्टीवार यांनी भाजपच्या सत्ताकेंद्रित धोरणांवर, भ्रष्टाचारावर आणि विकासविरोधी कार्यशैलीवर परखड टीका केली.
वडेट्टीवार म्हणाले, “नागपूर महापालिकेत अनेक मूलभूत समस्या प्रलंबित असतानाही भाजपने केवळ पैशाच्या बळावर सत्तेवर ताबा मिळवण्यावर भर दिला आहे. विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्यात आलं. सत्ताधाऱ्यांचे निर्णय हे नागपूरच्या विकासासाठी नसून, त्यांच्या व्यक्तिगत फायद्यासाठी घेतले गेले आहेत.”
वडेट्टीवार यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. “दोघेही नागपूरचे असूनही शहराच्या समस्या आणि विकासाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं. नागपूरच्या विकासाचा बागुलबुवा करून जनतेची फसवणूक करण्यात आली,” असा आरोप त्यांनी केला.
ओबीसी समाजाच्या मुद्द्यावरही वडेट्टीवारांनी केंद्र सरकारला धारेवर धरले. “ओबीसी समाजाच्या पाठीवर स्वार होऊन भाजप सत्तेत आली, मात्र आज या समाजावर अन्याय होत आहे. राहुल गांधी यांनी ओबीसी जनगणनेची मूळ मागणी केली आणि भाजप सरकारने केवळ निवडणुकीच्या तोंडावर घोषणा करून समाजाची दिशाभूल केली आहे,” असे ते म्हणाले.