होर्मुझ सामुद्रधुनीत मालवाहू जहाजावर इराणचा ड्रोन हल्ला; अमेरिका-इराण शांतता करारावर प्रश्नचिन्ह

Iran drone attack cargo ship Strait of Hormuz | अमेरिका आणि इराण यांच्यात ऐतिहासिक सामंजस्य करार झाल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच जागतिक चिंता वाढवणारी एक मोठी घटना समोर आली आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीत एका मालवाहू जहाजावर ड्रोन हल्ला केल्याची माहिती उघडकीस आली आहे. या थेट हल्ल्यामुळे नुकत्याच झालेल्या शांतता करारावर आणि शस्त्रसंधीवर आता मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ‘इंडियन एक्सप्रेस’ आणि ‘रॉयटर्स’ने अमेरिकी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे.
अमेरिकी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, इराणच्या ‘इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ने (IRGC) गुरुवारी होर्मुझ सामुद्रधुनीत हा ड्रोन हल्ला केला. हल्ला झालेल्या या मालवाहू जहाजावर सिंगापूरचा ध्वज होता. ब्रिटिश नौदल संस्था ‘युकेएमटीओ’ने (UKMTO) देखील ओमानजवळ जहाजावर हल्ला झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
विशेष म्हणजे, आयआरजीसीने गुरुवारी पनामाचा ध्वज असलेल्या इतर दोन जहाजांनाही त्यांचा सागरी मार्ग बदलण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
इराणचा आधीच होता इशारा; UN ची मोहीम थांबली
या हल्ल्यापूर्वी इराणच्या ‘पर्शियन गल्फ सामुद्रधुनी प्राधिकरणा’ने एक पत्रक जारी केले होते. यामध्ये त्यांनी स्पष्ट केले होते की, “निश्चित केलेला सागरी मार्ग सोडून इतर मार्गाने प्रवास करणाऱ्या जहाजांच्या सुरक्षेची हमी इराण देणार नाही. अशा परिस्थितीत काही अघटीत घडल्यास त्याला जहाजाचे मालक, चालक आणि कप्तान स्वतः जबाबदार असतील.”
हेही वाचा
रोबोटच्या सहाय्याने विमानतळाचे हस्तांतरण
या ताज्या हल्ल्यामुळे निर्माण झालेली गंभीर परिस्थिती पाहता, संयुक्त राष्ट्राच्या (UN) आंतरराष्ट्रीय नौदल संस्थेने होर्मुझ सामुद्रधुनीत अडकून पडलेल्या जहाजांना सुरक्षित बाहेर काढण्याची आपली मोहीम तात्पुरती थांबवली आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती संस्थेचे सचिव अर्सेनिओ डॉमिन्गेज यांनी दिली.
…तरीही डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
एकीकडे इराणकडून हल्ले सुरू असताना, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मात्र व्हाईट हाऊसमध्ये बोलताना वेगळाच दावा केला आहे. ट्रम्प म्हणाले की, “इराण सध्या आर्थिक आणि राजकीयदृष्ट्या पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. अमेरिका आपल्या ताकदीच्या बळावर हा करार करत आहे.”
“या शांतता करारासाठी स्वतः इराणने अमेरिकेकडे गळ घातली होती. इराण कधीही अण्वस्त्र निर्मिती करणार नाही, अशी हमी त्यांनी आम्हाला दिली आहे. तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग असलेली होर्मुझ सामुद्रधुनी देखील इराण खुली ठेवेल,” असा विश्वास ट्रम्प यांनी व्यक्त केला.
परंतु, ट्रम्प यांच्या या दाव्याच्या अगदी उलट कृती इराणने समुद्रात करून दाखवल्याने, हा शांतता करार टिकणार की दोन्ही देशांमधील तणाव पुन्हा वाढणार, याकडे आता संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.





