नांदेडमध्ये भाजपचा ‘शंखनाद’; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तीन दिवस महाराष्ट्र दौऱ्यावर

नांदेड : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये भाजपने जोरदार तयारी सुरू केली असून, पक्षाचा ‘शंखनाद’ सभेच्या माध्यमातून निवडणूक रणधुमाळीला सुरुवात करण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 25 ते 27 मेदरम्यान तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर असून, यावेळी नांदेडमध्ये त्यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही उपस्थिती लाभणार आहे.
नवीन मोंढा मैदानावर पार पडणाऱ्या या सभेला ‘शंखनाद’ हे नाव देण्यात आले आहे. ही सभा केवळ शक्तिप्रदर्शन नसून, आगामी निवडणुकीच्या दृष्टीने पक्षाच्या रणनीतीचा आरंभ मानला जात आहे. नांदेडमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीनंतर अमित शहा पहिल्यांदाच येत आहेत, त्यामुळे या दौऱ्याला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे.
हेही वाचा – “राज्यात २०३० पर्यंत ५२ टक्के ऊर्जा हरित स्रोतांतून”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी या पार्श्वभूमीवर प्रतिक्रिया देताना, “ऑपरेशन सिंदूरचे यश, सैन्याचा गौरव आणि विकसित भारताचा शंखनाद अशा अंगाने या सभेचे महत्त्व आहे,” असे मत व्यक्त केले. मात्र, भाजपच्या रणनीतीनुसार ही सभा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ ठरणार आहे असे बोलले जात आहे.