छत्रपती शिवरायांनी समर्थ रामदास स्वामींकडे राजपाट सोपवला; नागपुरात बागेश्वरबाबांचं वादग्रस्त वक्तव्य

Dhirendra Shastri | बागेश्वर धाम सरकारचे प्रमुख (पीठाधीश्वर) धीरेंद्र शास्त्री (बागेश्वर बाबा) यांनी नागपूरातील कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या विधानामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत हे वक्तव्य करण्यात आले.
शुक्रवारी नागपूरातील जामठा येथील नॅशनल कॅन्सर हॉस्पिटल परिसरात भारतदुर्गा मंदिराच्या भूमिपूजन व कोनशिला अनावरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, अवधेशानंद गिरी, गोविंद गिरी, साध्वी ऋतंभरा, शैलेश जोगळेकर, ॲड. सुनील मनोहर आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा
आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांची प्रशिक्षण केंद्रास भेट; जनगणना मोहिमेला वेग
आपल्या भाषणात धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यातील एका प्रसंगाचा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की, एका मोहिमेनंतर शिवाजी महाराज थकले होते आणि ते समर्थ रामदास स्वामींकडे गेले. त्यांनी आपला मुकुट काढून त्यांच्या पायाशी ठेवत आपण थकलो असून आता राज्यकारभार सांभाळावा, अशी विनंती केली. त्यावर रामदास स्वामींनी ती मान्य केल्याचे सांगितले.
पुढे त्यांनी ‘तू माझा शिष्य आहेस आणि मी तुझा गुरु’ असे सांगत पुन्हा मुकुट शिवाजी महाराजांच्या मस्तकावर ठेवला आणि राज्यकारभार चालवण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. यावरून भारतात महामानवांचा जन्म झाला आहे, असे ते म्हणाले. भारतदुर्गा मंदिर लोकांचा गौरव वाढवेल आणि त्यातून अखंड भारताची संकल्पना बळकट होईल, असेही त्यांनी नमूद केले.
या विधानानंतर ऐतिहासिक संदर्भ आणि त्याच्या सत्यतेबाबत सामाजिक माध्यमांवर चर्चा सुरू असून, विविध स्तरांतून प्रतिक्रिया येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.





