निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मतदानापूर्वी द्यावे लागणार हमीपत्र, एकाच ठिकाणी मतदान करता येणार

पुणे : राज्यातील आगामी महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मुक्त आणि पारदर्शक वातावरणात घेण्यासाठी मतदार यादी बिनचूक असणे आवश्यक असल्याचे राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले. या पार्श्वभूमीवर मतदार यादीतील दुबार मतदारांची नावे ओळखून त्यांच्या नावापुढे दुबार मतदार, अशी नोंद करण्यात येणार आहे. दुबार मतदार मतदानासाठी आल्यास इतर कोणत्याही केंद्रावर मतदान केले नसल्याचे हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी विधानसभेची मतदार यादी वापरली जाते. मात्र, यामध्ये आढळणाऱ्या दुबार नावांच्या त्रुटी दूर करण्यासाठी विशेष कार्यप्रणाली निश्चित करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत. अनेक वेळा एकाच मतदाराचे नाव एकापेक्षा जास्त ठिकाणी किंवा एकाच ठिकाणी दोनदा (दुबार) नोंदवले जाते. दुबार नावांमुळे निवडणुकीच्या वेळी बनावट मतदानाची शक्यता वाढून यादीची विश्वासार्हता कमी होते.
हेही वाचा – शिष्यवृत्तीसाठी आता कागदपत्रांची कटकट संपली ; सरकारच्या एका निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा
यासाठी राज्य निवडणूक आयोगाने संभाव्य दुबार नावे आढळल्यास कार्यपद्धतीबाबत सविस्तर आदेश सर्व महापालिका आयुक्त व जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत.दुबार मतदारांची माहिती होण्यासाठी अधिकाऱ्यांना संकेतस्थळावर दुबार मतदारांची यादी मिळणार आहे. संभाव्य दुबार मतदाराच्या नावासमोर डबल स्टार असे चिन्ह नमूद करण्यात आले आहे. स्थानिकरीत्या तपासणी करून ती खरोखरच एकाच व्यक्तीची आहे किंवा वेगळ्या व्यक्तींची आहे, याबाबत खात्री करण्याच्या सूचनाही आयोगाने दिल्या आहेत.
आधीच माहिती द्या..
दुबार मतदारांना दोनपैकी कोणत्या वॉर्डात मतदान करणार आहे, याची माहिती अधिकाऱ्यांना आधी द्यावी लागणार आहे. जेथे मतदान करणार आहे, त्याबाबतचे पत्र संबधित दुबार मतदारांकडून घेतले जाणार आहे. त्या मतदाराला त्याच मतदान केंद्रांवर मतदान करता येणार आहे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.




