शिष्यवृत्तीसाठी आता कागदपत्रांची कटकट संपली ; सरकारच्या एका निर्णयामुळे लाखो विद्यार्थ्यांना दिलासा

पुणे : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती मिळवताना विद्यार्थ्यांना वारंवार करावी लागणारी नोंदणी, सादर केलेली कागदपत्रे महाविद्यालयांकडून अमान्य होणे आणि त्यामुळे शिष्यवृत्तीपासून वंचित राहण्याची भीती असते. या सर्व समस्यांवर राज्य सरकारने ठोस उपाय शोधला असून, राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने विद्यार्थ्यांचा हा त्रास कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. यापुढे राज्य सीईटी सेलकडे प्रवेशावेळी सादर केलेली आणि पडताळणी झालेली सर्व कागदपत्रे थेट शिष्यवृत्तीसाठीच्या महाडीबीटी पोर्टलकडे वर्ग केली जाणार आहेत.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे दरवर्षी साधारण ४० ते ४२ लाख विद्यार्थ्यांची नोंदणी होते. यापैकी तब्बल ७० टक्के विद्यार्थी कोणत्या ना कोणत्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेत असतात. मात्र, अनेकदा ईडब्ल्यूएस, एसईबीसी, मागासवर्गीय आदी प्रवर्गांमधील विद्यार्थ्यांना योग्य कागदपत्रांअभावी महाविद्यालयीन स्तरावर शिष्यवृत्ती नाकारल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. विद्यार्थ्यांना होणारा हा मनस्ताप थांबवण्यासाठी विभागाने आता तंत्रज्ञानाची मदत घेत ही नवी प्रणाली विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यातील सुमारे १३ ते १४ लाख विद्यार्थी विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी राज्य ‘सीईटी’ सेलकडे नोंदणी करतात. या वेळी विद्यार्थी त्यांचा संबंधित प्रवर्ग नोंदवतात आणि त्यानुसार आवश्यक ती कागदपत्रे सीईटीच्या संकेतस्थळावर अपलोड करतात. या सर्व कागदपत्रांची सीईटी कक्षाकडून रीतसर पडताळणीही केली जाते. आता उच्च व तंत्रशिक्षण विभागाने ठरवल्यानुसार हीच पडताळणी झालेली कागदपत्रे विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन प्रवेशासाठी आणि शिष्यवृत्तीसाठी अंतिम ग्राह्य धरली जाणार आहेत.
हेही वाचा – व्यापारविषयक करारावेळी कुठलेही आश्वासन देऊ नये; RBI चे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी दिला सल्ला
दरम्यान, शिष्यवृत्तीचे वाटप करणाऱ्या महाडीबीटी पोर्टलच्या निकषांनुसार काही अतिरिक्त कागदपत्रांची आवश्यकता असू शकते. अशा जादा कागदपत्रांची यादी यंदा महाडीबीटीकडून सीईटी कक्षाकडे सोपवली जाणार आहे. सीईटी सेल या नव्या कागदपत्रांचा समावेश त्यांच्या प्रवेश नोंदणी प्रक्रियेतच करणार आहे.येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांना सीईटी नोंदणीवेळीच ही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागतील.
एकदा ही प्रक्रिया पूर्ण झाली, की हीच सर्व कागदपत्रे थेट महाविद्यालयांकडे आणि महाडीबीटी पोर्टलकडे वर्ग होतील. परिणामी, विद्यार्थ्यांना महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्तीसाठी पुन्हा कोणतीही कागदपत्रे देण्याची गरज भासणार नाही. या निर्णयामुळे कागदपत्रांच्या आधारे शिष्यवृत्ती नाकारण्याचे प्रकार पूर्णपणे थांबतील, असा विश्वास उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
नूतनीकरण प्रक्रिया सोप्पी..
तथापि, पहिल्या वर्षी शिष्यवृत्ती मिळाल्यानंतर, पुढील वर्षांसाठी शिष्यवृत्तीचे नूतनीकरण करताना विद्यार्थ्यांना केवळ त्यांची मागील वर्षाची गुणपत्रिका आणि महाविद्यालयातील उपस्थितीचे प्रमाणपत्र द्यावे लागणार आहे. त्यामुळे नूतनीकरणाची प्रक्रियाही अत्यंत सुलभ होणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे.




