‘पिंपरी चिंचवड महोत्सव’ आता ‘ब्रँड’ होतोय!
लेखक दिग्दर्शक सुजय डहाके यांचे मत

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कलाविश्वाची व्याप्ती विस्तारणारा उपक्रम आहे. आंतर राष्ट्रीय स्तरावरील सांस्कृतिक विश्वाचे भावबंध यातून जोडले जातात. नवोदित कलाकार, दिग्दर्शक, आणि रसिक प्रेक्षक यांच्यातील बंध दृढ करणारा हा महोत्सव पुढच्या वर्षी आणखी मोठा, व्यापक आणि प्रभावशाली असेल, याची खात्री आहे. असे मत लेखक-दिग्दर्शक सुजय डहाके यांनी व्यक्त केले. पिंपरी चिंचवड महोत्सव आता ब्रँड होत आहे असेही ते म्हणाले.
पिंपरी चिंचवड महापालिका आणि पिंपरी चिंचवड फिल्म सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पिंपरी चिंचवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा पुरस्कार वितरण समारंभ संपन्न झाला. आयुक्त शेखर सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे यांच्या नेतृत्वाखाली आकुर्डी येथील ग. दि. माडगूळकर नाट्यगृहात पार पडलेल्या या सोहळ्यात देश-विदेशातील कलावंतांना विविध विभागांतील पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
यावेळी राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे सदस्य ॲड. गोरक्ष लोखंडे, महापालिका उप आयुक्त पंकज पाटील, विशेष अधिकारी तथा मराठी भाषा समन्वय अधिकारी किरण गायकवाड, सुप्रसिद्ध लेखक दिग्दर्शक सुजय डहाके, रमेश होलबोले, अभिनेत्री राजश्री देशपांडे, मुख्यमंत्री सहाय्यक शुभम सातकर, रयत शिक्षण संस्थेमधील प्राचार्य डॉ. अरुण आंधळे आदी उपस्थित होते.
राजश्री देशपांडे यांनी स्वानुभव कथन केले. कलाक्षेत्रात आपली अभिव्यक्ती सादर करण्याची संधी मिळत असते. महोत्सवाच्या माध्यमातून त्याचे वैश्विक पातळीवर आदान प्रदान होण्यास मदत मिळत असते. यशासाठी संघर्ष महत्त्वाचा असून त्यात सातत्य असावे, असे त्या म्हणाल्या.
हेही वाचा – बंगाली जनतेने सिंदूरची ताकद दाखवून द्यावी; केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
रमेश होलबोले म्हणाले, महापालिका अशा सांस्कृतिक आयोजनासाठी पुढाकार घेते हे आनंदाची बाब आहे. अशा कार्यक्रमाचे नियोजन करण्यासाठी अधिक वेळ देण्याची आवश्यकता असते. नवकलाविष्कारासाठी वातावरण निर्मिती आणि पाठबळ महत्त्वाचे असते. महापालिकेच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळीला चालना मिळणार असून असे उपक्रम राबविण्यासाठी महापालिकेने निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
पिंपरी चिंचवड शहराने भौतिक विकासासोबत आता सांस्कृतिक विकासावरदेखील भर दिला असून महापालिकेसह विविध संस्था यासाठी झटत आहेत. या मेहनतीतून शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील सांस्कृतिक ओळख निश्चित निर्माण होईल, असे शुभम सातकर यावेळी म्हणाले. रयत शिक्षण संस्था अशा उपक्रमात नेहमी सहभागी राहील असे प्राचार्य आंधळे यांनी यावेळी नमूद केले.
यावेळी महोत्सवात नामवंत ज्यूरी मार्फत निवडण्यात आलेल्या विजेत्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. यामध्ये व्हिडीओ सॉंग, अॅनिमेशन फिल्म, चित्रपट, लघुपट व माहितीपट व ६० सेकंड चित्रपट अशा वर्गवारीचा समावेश होता.
आंतरराष्ट्रीय स्तरावर पिंपरी चिंचवड शहराचे नाव सुलतान या लघुपटाच्या माध्यमातून गाजवत असलेले दिग्दर्शक अविनाश कांबीकर यांचाही विशेष सन्मान यावेळी करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विक्रम शेळके, पौर्णिमा भोर, पलक कौल आणि श्रुती रनवरे यांनी केले. आभार डॉ विश्वास शेंबेकर यांनी मानले. या महोत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी मुंबा फिल्म फाउंडेशन आणि रयत शिक्षण संस्थेचे महात्मा फुले महाविद्यालय, पिंपरी यांचे विशेष सहकार्य लाभले.
विभाग निहाय विजेत्यांची नावे
प्रमुख विजेते:
• सर्वोत्कृष्ट चित्रपट – निर्जली
• सर्वोत्कृष्ट लघुपट – थुनाई
• सर्वोत्कृष्ट अॅनिमेशन फिल्म – लेस
• सर्वोत्कृष्ट माहितीपट – दि लॉस्ट पॅराडाईज
• सर्वोत्कृष्ट ६० सेकंद चित्रपट – पालवी
वैयक्तिक पुरस्कार:
• सर्वोत्कृष्ट अभिनेता – तुषार शिंगाडे (सोंगा)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री – प्रियंका भेरिया (दि फर्स्ट फिल्म)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक – विघ्नेश परमशिवम (थुनाई)
• सर्वोत्कृष्ट पटकथा – निखिल शिंदे (डम्प यार्ड)
• सर्वोत्कृष्ट ध्वनी – सुकन्या भावळ (एक दिवस)
• सर्वोत्कृष्ट छायाचित्रण – ऍंथोनी एन सेक
• सर्वोत्कृष्ट संपादन – दि वोको फ्रॉम हेल
विशेष पुरस्कार व नामांकने:
• ज्यूरी पुरस्कार – चित्रपट विभाग: पूवू (फुल)
• सर्वोत्कृष्ट ज्यूरी पुरस्कार: रिबेल(प्रथम) अंकुर(द्वितीय)
• विशेष नामांकने: दि फिशर, कॅनव्हास
व्हिडीओ सॉंग :
प्रथम- मेरी बहेना
द्वितीय- बार्बी बोना
तृतीय- आईज
लघुपट
प्रथम – तुनाई
द्वितीय- दि फस्ट फिल्म
तृतीय- खिचडी भात