“आम्ही काय मातोश्रीवर भाजी चिरायला गेलो नव्हतो”; बच्चू कडूंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार

पुणे | “उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असताना आम्ही स्वतः मातोश्रीवर जाऊन त्यांना पाठिंबा दिला. आमच्या पाठिंब्यामुळेच ते मुख्यमंत्री झाले आणि त्यानंतरच आम्हाला मंत्रीपद दिले गेले. उद्धव ठाकरे एवढे मोठे नेते असूनही आपण कशामुळे मुख्यमंत्री झालो होतो? हे त्यांना माहिती असायला हवे,” अशा अत्यंत कडक शब्दांत प्रहार जनशक्ती पक्षाचे आमदार बच्चू कडू यांनी शिवसेना (ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर प्रतिहल्ला चढवला आहे.
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना आमदार बच्चू कडू यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेचा खरपूस समाचार घेतला. ‘बच्चू कडू यांना घरी बोलावून मंत्री केले, तरीही हा शिवसैनिक सोडून गेला,’ अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी कडू यांच्यावर टीका केली होती, ज्याला कडू यांनी आता सडेतोड उत्तर दिले आहे.
महाविकास आघाडी सरकारच्या स्थापने वेळचा प्रसंग सांगताना बच्चू कडू म्हणाले, “त्यावेळी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे पक्ष एकत्र येत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते. मात्र, बहुमताच्या संख्याबळासाठी शिवसेनेला अपक्षांची गरज होती. तेव्हा एकनाथ शिंदे यांनी आम्हाला फोन करून शिवसेनेचे संख्याबळ कमी पडत असल्याचे सांगत अपक्षांच्या पाठिंब्याची आवश्यकता असल्याचे म्हटले होते. त्यानंतरच आम्ही मातोश्रीवर जाऊन पाठिंबा दिला. आमच्यामुळे ते मुख्यमंत्री झाले, हे उद्धव ठाकरे आता सोयीस्करपणे सांगत नाहीत.”
हेही वाचा
पिंपरी-चिंचवडमध्ये 9 जूनपर्यंत निर्बंध; मोर्चे, सभा आणि घोषणाबाजीवर बंदी
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना बच्चू कडू यांनी राजकारणातील वास्तवावर थेट बोट ठेवले. ते म्हणाले, “उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदासाठी अपक्षांची गरज होतीच आणि त्या बदल्यात आम्हाला मंत्रीपदाची अपेक्षा होती. आम्ही काय मातोश्रीवर भाजी चिरायला गेलो नव्हतो? इतका मोठा माणूस सात वर्षांनंतर आता हा विषय काढतो याचे नवल वाटते.”
“आम्हाला काहीच नको, आम्ही तुम्हाला विनाअट पाठिंबा देतो, असे राजकारणात कोणीही म्हणत नाही. प्रत्येकाला पद आणि चांगले खाते हवे असते. हे काय बाप-लेकाचे नाते आहे का? ‘देना है तो लेना भी जानते है!’ राजकारण हा निव्वळ व्यवहार असतो आणि हे उद्धव साहेबांना समजायला हवे होते,” अशी स्पष्ट टिप्पणीही आमदार बच्चू कडू यांनी यावेळी केली. त्यांच्या या विधानामुळे राज्याच्या राजकीय वर्तुळात आता नव्या चर्चांना उधाण आले आहे.





