महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती २३ कोटी, ADR च्या अहवालातून स्पष्ट

मुंबई : महाराष्ट्रातील आमदारांची सरासरी संपत्ती २३.५१ कोटी रूपये असल्याचं एका अहवालातून समोर आलं आहे. तर कर्नाटकातील आमदारांची सरासरी संपत्ती ही ६४.३९ कोटी रूपये असल्याचं या अहवालातून स्पष्ट झालं आहे. तसेच देशातील सर्व आमदारांची संपत्ती ही १३.६३ कोटी रूपये असल्याचं या अहवालातून समोर आलं आहे.
असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सने (ADR) च्या सर्वे नुसार, देशातील राज्य विधानसभेतील प्रत्येक आमदार सरासरी १३.६३ कोटींचा मालक असल्याचं स्पष्ट झालं आहे. कर्नाटकातील २३३ आमदारांची सरासरी मालमत्ता ६४.३९ कोटी रूपये आहे. देशातील ही सर्वाधिक संपत्ती असलेल्या आमदारांचे राज्य आहे. तर आंध्र प्रदेशात १७४ आमदारांची सरासरी संपत्ती २८.२४ कोटी रूपये आहे. तसेच महाराष्ट्रातील २८४ आमदारांची सरासरी संपत्ती २३.५१ कोटी रूपये आहे.
हेही वाचा – सोशल मीडियावर हिंदू धर्माचे देव देवतांचे आक्षेपार्ह फोटो प्रसारित केल्याने १२ जणांवर गुन्हा दाखल
त्रिपुरामध्ये ५६ आमदारांची सरासरी संपत्ती १.५४ कोटी इतकी आहे. ही देशातील सर्वात कमी संपत्ती आहे. पश्चिम बंगालमध्ये २९३ आमदारांची सरासरी संपत्ती २.८० कोटी इतकी आहे. केरळमधील १३५ आमदारांची सरासरी संपत्ती ३.१५ कोटी इतकी आहे. तसेच महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, गुजरात आणि मध्य प्रदेशातही १०० कोटी रूपयांपेक्षा जास्त संपत्ती असलेले आमदार आहेत.
गंभीर गुन्हे दाखल असलेले आमदार
- दिल्ली : ७० आमदारांपैकी ३७ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
- बिहार : २४२ आमदारांपैकी १२२ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
- महाराष्ट्र : २८४ आमदारांपैकी ११४ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
- झारखंड : ७९ आमदारांपैकी ३१ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
- तेलंगणा : ११८ आमदारांपैकी ४६ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल
- उत्तर प्रदेश : ४०३ आमदारांपैकी १५५ आमदारांवर गंभीर गुन्हे दाखल





