‘नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा ही तर सर्वात मोठी घोडचूक’; अशोक चव्हाण यांचं विधान

मुंबई | अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपुर्वी भाजपात प्रवेश केला आहे. भाजपात प्रवेश झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी त्यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. काँग्रेसमध्ये त्यांची घुसमट होऊ लागल्यामुळे त्यांनी पक्ष सोडला असल्याची चर्चा आहे. यावरून त्यांनी भाष्य केलं आहे. तसेच, नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा द्यायला नको होता, असंही ते म्हणाले.
अशोक चव्हाण म्हणाले की, मागच्या दोन ते तीन वर्षांपासून मी अस्वस्थ आहे. राजकारण करायचं आहे. इतक्या लवकर मला राजकीय क्षेत्रातून मला बाहेर पडायचं नाही. पण घुसमट सहन करत आपण एकाच पक्षात राहण्यापेक्षा मी पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला. कुठल्या आमदाराला मी माझ्याबरोबर ये हे सांगितलेलं नाही. भाजपात विनाअट येण्याचा निर्णय हा सर्वस्वी माझा होता.
हेही वाचा – ‘रामकृष्ण मोरे यांच्या स्मृती आप्पा बारणे यांनी ताज्या ठेवल्या’; डॉ. सदानंद मोरे
नाना पटोले यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिली ही तर सर्वात मोठी घोडचूक ठरली. अजित पवार, उद्धव ठाकरे हे सगळेच नाराज झाले होते. विधानसभेला अध्यक्ष नाही असं कसं काय? त्यानंतर ज्या घटना घडल्या, विद्यमान अध्यक्षांनी हातात सूत्रं घेतल्यानंतर ज्या गोष्टी घडल्या त्या पाहिल्या तर नाना पटोले जर अध्यक्ष राहिले असते तर सरकार गेलं नसतं आणि पुढच्या गोष्टी टाळता आल्या असत्या. विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा ही फार मोठी गोष्ट ठरली. काही चर्चा झाल्या होत्या. पण अध्यक्षपदाचा राजीनामा घेऊन ते पद रिक्त ठेवण्यात आलं. ज्या वेळी निर्णय होतात त्या प्रक्रिया सांगता येत नाहीत. पण ते घडलं नसतं तर अनेक गोष्टी झाल्या नसत्या. महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी मिळाली ती या घटनेपासून मिळाली असं माझं ठाम मत आहे, असंही अशोक चव्हाण म्हणाले.