ठाकरे बंधू एकत्र येताच महाविकासआघाडीत फूट! विजयी मेळाव्याला काँग्रेसची दांडी

मुंबई : ठाकरे बंधूंची जवळीकीचा महाविकास आघाडीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. कारण ठाकरे बंधुंच्या विजयी मेळाव्यापासून काँग्रेस दूर राहिले आहे. विजयी मेळावा कोणत्या पक्षाचा नसून केवळ मराठीच्या मुद्द्यावर सर्वपक्षीयांना एकत्र येण्याचं आवाहन ठाकरे बंधुंनी केलं आहे. मात्र काँग्रेसने या मुद्द्यावरून ठाकरे बंधूंसोबत नसल्याचे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.
ठाकरे बंधूंनी आयोजित केलेल्या विजयी मेळाव्याला शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे, आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे अजित नवले, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, कॉम्रेड प्रकाश रेड्डी यांची उपस्थिती होती.
यासोबतचस मुंबई विद्यापीठाचे माजी कुलुगुरु डॉ. भालचंद्र मुणगेकर, तेजस्विनी पंडीत, सिद्धार्थ जाधव, महेश मांजरेकर, आदी कलाकारांनीदेखील उपस्थिती दर्शवली आहे. मात्र, काँग्रेसचा एकही नेता किंवा आमदार, खासदार या मेळाव्याला उपस्थित राहिल नाहीत.
हेही वाचा – ‘आमच्यातील अंतरपाट अनाजी पंताने दूर केला’; उद्धव ठाकरे कडाडले
मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी आमंत्रण देऊनही काँग्रेस पक्षाने विजयी मेळाव्याला पाठ फिरवली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पक्ष नेतृत्वाने विजयी सभेपासून अंतर राखण्याचा आदेश देण्यात आला होता.
त्यामुळे राजकीय वर्तुळात महाविकासआघाडीत फूट पडली या चर्चेंने जोर धरला आहे. राज आणि उद्धव एकत्र आले, तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना, विशेषतः काँग्रेस आणि राष्ट्रवादीला, युतीच्या नव्या समीकरणांचा विचार करावा लागेल.