आपच्या १६ उमेदवारांना १५ कोटींची ऑफर; केजरीवाल यांचा ट्विट करत भाजपवर गंभीर आरोप

Delhi Election result 2025 | दिल्ली विधानसभेसाठी मतदान पार पडले असून आता एक्झिट पोल्सचे अंदाज समोर येण्यास सुरुवात झाली आहे. बहुतेक एक्झिट पोल्सनी सुमारे २७ वर्षांनंतर राजधानी दिल्लीत भाजपाचे सरकार येणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यामुळे आम आदमी पक्षाला हा मोठा धक्का मानला जातो. यातच आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी भारतीय जनता पक्षावर उमेदवार फोडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की, काही एजन्सी दाखवत आहेत की शिवीगाळ करणाऱ्या पक्षाला ५५ हून अधिक जागांवर विजय मिळत आहे. गेल्या १६ तासात आमच्या १६ उमेदवारांना फोन आले आहेत की ‘आप’ सोडून त्यांच्या पक्षात या, मंत्री बनवू आणि प्रत्येकाला १५-१५ कोटी देऊ. जर यांच्या पक्षाच्या ५५ हून अधिक जागा येत असतील तर आमच्या उमेदवारांना फोन करण्याची काय आवश्यकता आहे? यावरून हे स्पष्ट आहे की बनावट सर्व्हे करवून घेण्यात आले जेणेकरून वातावरण तयार करत काही उमेदवारांना फोडता येऊ शकेल. पण शिवीगाळ करणाऱ्यांनो आमचा एकही उमेदवार फुटणार नाही.
हेही वाचा : महाराष्ट्र औद्योगिक गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम राज्य; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
अरविंद केजरीवाल यांच्या प्रमाणेच सुलतानपूर माजरा येथील आपचे उमेदवार आणि दिल्ली सरकारमधील मंत्री मुकेश अहलावत यांनी देखील ऑफर मिळाल्याचा दावा केला आहे. मला या नंबरवरून फोन आला. त्यांनी सांगितलं की, त्यांचे सरकार स्थापन होत आहे, मंत्री बनवू आणि १५ कोटीही देऊ. आप सोडून इकडे या. मी त्यांना सांगू इच्छितो की जो सन्मान केजरीवाल आणि आप पक्षाने मला दिला आहे, मी मरेपर्यंत आपला पक्ष सोडणार नाही, असे मुकेश अहलावत यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
बुधवारी दिल्लीतील ७० विधानसभा मतदारसंघात मतदान पार पडले होते. तर शनिवारी (फेब्रुवारी ८) मतमोजणी केली जाणार आहे. सध्या या निकालाची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. दिल्लीत आप सलग तिसर्यांदा सत्तेत येणार की भाजपा २७ वर्षांची प्रतिक्षा संपवणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.