‘पार्थ पवारांनी मावळमधून निवडणूक लढवावी, ते जिंकतील’; आमदार अण्णा बनसोडे यांचं विधान

पिंपरी : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष तयारीला लागले आहेत. मावळ लोकसभेच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. तर, पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी पार्थ पवार यांना उमेदवारी देण्यात यावी, ते निश्चित निवडून येतील असं विधान केलं आहे.
राज्यामध्ये भाजप, शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यात महायुती आहे. परंतु, या महायुतीचा धर्म केवळ अजित पवार गटानेच पाळायचा का? असा प्रश्न उपस्थित करत सुनील शेळके यांनी श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. श्रीरंग बारणे यांनी गेल्या नऊ वर्षांत मावळ लोकसभा मतदारसंघात काय काम केले आहे? यासंबंधी त्यांनी उत्तर द्यावं, असं म्हटलं आहे.
हेही वाचा – शेतकऱ्यांना मोठा दिलासा! दुधासाठी सरकार देणार ५ रुपयांचं अनुदान
दुसरीकडे पिंपरी विधानसभा अजित पवार गटाचे आमदार अण्णा बनसोडे यांनी देखील पार्थ पवारसाठी ‘ती’ जागा सोडण्यात यावी असं म्हटलं आहे. पार्थ पवार यांनी या अगोदर देखील मावळ लोकसभा निवडणूक लढवली होती. आता त्यांना अधिक अनुभव असून त्यांनी निवडणूक लढवल्यास ते निश्चितच निवडून येतील, असा विश्वास आमदार अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केला आहे. अजित पवार गटाच्या दोन्ही आमदारांच्या वक्तव्यांमुळे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्यापुढे पेच निर्माण झाला आहे. यामुळे महायुतीत उमेदवारीवरून काही बदल होतात का? हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.




