Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

‘मुलुंडमधील अपघात नाही, तर प्रशासनाने केलेला खून’; अमित ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल

मुंबई | मुलुंड येथे सुरू असलेल्या मेट्रो प्रकल्पातील पिलरचा भाग कोसळून एका नागरिकाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ऐन गर्दीच्या वेळी हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून मेट्रोच्या कामाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या प्रकरणी संबंधित कंत्राटदारावर कारवाई करण्यात आली असून आतापर्यंत पाच जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, या दुर्घटनेवरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यानंतर आता मनसे नेते अमित ठाकरे यांनीही सोशल मीडियावर पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला आहे.

अमित ठाकरे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे की, मुलुंडमध्ये मेट्रोचा स्लॅब कोसळून एका निष्पाप नागरिकाचा मृत्यू झाला आणि हा अपघात नसून प्रशासनाने केलेला खून आहे. निकृष्ट दर्जाचे काम, सुरक्षेच्या नियमांकडे दुर्लक्ष आणि वारंवार ताकीद देऊनही घेतलेली हलगर्जी याला जबाबदार कोण, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा     :            फ्रान्स प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांचे मुंबईत आगमन 

सरकारच्या प्राधान्यक्रमावर प्रश्नचिन्ह..

एका बाजूला सामान्य मुंबईकरांच्या जीवाशी खेळ सुरू असताना दुसरीकडे सरकार कोस्टल रोडवरील ‘म्युझिकल रस्ते’सारख्या प्रकल्पांत गुंतले असल्याची टीका त्यांनी केली. जपानची नक्कल करताना तेथील सुरक्षितता आणि मूलभूत सुविधा लक्षात घेतल्या जात नाहीत, असा आरोपही त्यांनी केला.

भरपाईवरून संताप

कंत्राटदाराला ६ कोटींचा दंड आणि मृताच्या कुटुंबाला केवळ ५ लाखांची मदत यातील तफावतही त्यांनी अधोरेखित केली. एका कुटुंबाचा आधार गमावल्यावर इतकी कमी मदत देणं ही सरकारची संवेदनशीलतेची कमतरता असल्याचं त्यांनी म्हटलं.

‘सुरक्षित आयुष्य हीच जनतेची मागणी’

मुंबईत यापूर्वीही पूल, होर्डिंग आणि बांधकाम दुर्घटनांमध्ये अनेकांचे जीव गेले असून चौकशीचे आदेश देऊनही परिस्थिती बदलत नसल्याचा आरोप त्यांनी केला. “आम्हाला गाणी वाजवणारे रस्ते नकोत, तर सुरक्षित आणि दर्जेदार पायाभूत सुविधा हव्यात,” असं सांगत जनतेच्या जिवाशी खेळ थांबवण्याची मागणी अमित ठाकरे यांनी केली आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button