‘मीडियात बोलून युती होत नाही’; अमित ठाकरेंचा संजय राऊतांना टोला

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) यांच्या संभाव्य युतीच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह इतर नेते याबाबत सातत्याने वक्तव्ये करत असून, युतीच्या शक्यतांवर भाष्य करत आहेत. मात्र, मनसे नेते अमित ठाकरे यांनी या चर्चांवर सूचक टिप्पणी करत शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांना टोला लगावला आहे.
अमित ठाकरे म्हणाले, की युती होणे किंवा एकत्र येण्याबाबत दोन भावांनी (राज ठाकरे व उद्धव ठाकरे) बोललं पाहिजे. करोना काळात राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पहिला फोन केला होता. त्या काळात आमचा पक्ष त्यांच्या सरकारबरोबर होता. मी अनेकदा राज ठाकरे यांना पहिला फोन करताना पाहिलं आहे. मात्र यावेळी केवळ माध्यमांवर चर्चा घडवून आणल्या जात आहेत. माध्यमांसमोर बोलून, वर्तमानपत्रात लिहून युत्या होत नाहीत. दोन्ही भावांकडे एकमेकांचे फोन नंबर आहेत. ते दोघे एकमेकांशी बोलू शकतात.
हेही वाचा : ‘ऑपरेशन सिंदूर ‘वर आता पावसाळी अधिवेशनात होणार चर्चा, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अधिवेशन
मला नाईलाजने प्रसारमाध्यमांसमोर यावं लागलं आहे. मी इथे आलोय कारण काही लोक रोज सकाळी उठून काहीतरी बोलत आहेत. मुळात तुम्ही कोणाला फसवताय? ते दोन भाऊ त्यांची चर्चा करतील. दोघांपैकी कोणीही पुढाकार घ्यावा. मी पुढाकार घेऊ शकत नाही. मी त्यात काही बोलू शकत नाही. ते दोन भाऊ जोवर या विषयावर काही बोलत नाहीत, तोवर मी यावर काहीच बोलणार नाही, असं अमित ठाकरे म्हणाले.