‘ऑपरेशन सिंदूर ‘वर आता पावसाळी अधिवेशनात होणार चर्चा, ‘या’ तारखेपासून सुरु होणार अधिवेशन

Monsoon Session Of Parliament | पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबाबत संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी विरोधी पक्ष सातत्याने करत असताना केंद्र सरकारने बुधवारी थेट संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारीखांची घोषणा करून टाकली. आगामी पावसाळी अधिवेशन २१ जुलै ते १२ ऑगस्ट या कालावधीत होईल असे केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले.
सरकारच्या नियोजनानुसार पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने तीन महिन्यांहून अधिक काळानंतर संसदेची दोन्ही सभागृहे २१ जुलै रोजी सुरू होणार आहेत. अर्थसंकल्पीय अधिवेशन या वर्षी ३१ जानेवारी ते ४ एप्रिल या काळात झाले होते. रिजिजूंनी माध्यमांशी बोलताना सांगितलं, “प्रत्येक अधिवेशनाचा स्वतंत्र महत्त्व असतो. यंदाच्या पावसाळी अधिवेशनात ‘ऑपरेशन सिंदूर’सह इतर गंभीर आणि महत्त्वाच्या विषयांवरही चर्चेला सरकार तयार आहे. सर्व पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतले जातील.”
हेही वाचा : अजित पवार आणि जपानच्या महावाणिज्यदूतांची भेट, पुण्यातील प्रश्नावर चर्चा
नियमांनुसार, पावसाळी अधिवेशनादरम्यान सर्व मुद्द्यांवर चर्चा करता येते. ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्यासाठी विरोधी पक्ष नेते लवकरात लवकर संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी करत असताना पावसाळी अधिवेशनाच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला. यामध्ये भारताने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले होते. त्याचबरोबर असे मानले जाते की न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या प्रकरणाचे पडसाद पावसाळी अधिवेशनात उमटू शकतात.