जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, ७ जणांचा मृत्यू; अमित शाहांचा कठोर कारवाईचा इशारा
नवी दिल्ली | जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर भागात मोठा हल्ला झाल्याची घटना समोर येत आहे. या हल्ल्यात सात जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या हल्ल्यात अनेकजण गंभीर जखमी झाले आहेत. या हल्ल्यानंतर देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिक्रिया देत या हल्ल्यात सहभागी अशलेल्यांना सोडले जाणार नाही, कठोर प्रत्युत्तर दिलं जाईल, असा इशारा दिला आहे.
अमित शाह नेमकं काय म्हणाले?
जम्मू-काश्मीरमधील गांदरबल जिल्ह्यातील गंगानगीरमध्ये नागरिकांवर झालेला दहशतवादी हल्ला हे भ्याड आणि घृणास्पद कृत्य आहे. या घृणास्पद कृत्यात सहभागी असलेल्यांना सोडले जाणार नाही आणि त्यांना आमच्या सुरक्षा दलांकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल. या दुःखाच्या प्रसंगी मी मृतांच्या कुटुंबियांप्रती मनापासून संवेदना व्यक्त करतो. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो, असं अमित शाह म्हणाले.
हेही वाचा – पुढील ३६ तास धोक्याचे! राज्यात पावसाचा जोर वाढला, हवामान खात्याकडून अलर्ट जारी
जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध केला आहे. त्यांनी म्हटलं की, गगनगीर येथे मजुरांवर झालेल्या भयंकर आणि भ्याड हल्ल्याची अत्यंत दु:खद बातमी. हे लोक या भागातील एका महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पावर काम करत होते. मी नि:शस्त्र निष्पाप लोकांवर झालेल्या या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करतो, असं ओमर अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.
गांदरबल जिल्ह्यातील गगनगीर सोनमर्गला जोडणाऱ्या झेड-मोर बोगद्यावर काही कामगार काम करत होते. मात्र, हे काम करत असतानाच अचानक दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात काम करणाऱ्या सात जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात एक डॉक्टर आणि सहा स्थलांतरित कामगारांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतीय जवानांनी घटनास्थळी दाखल होत दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू केलं आहे.