Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पर्यटकांच्या स्वागतासाठी हॉटेल, टेंट व्यावसायिक सज्ज

तळेगाव दाभाडे : थर्टी फर्स्ट व नववर्षाच्या स्वागताला मावळात येणार पर्यटकांचा महापूर, दि.२५ – नाताळ सण आणि त्यानंतर लगेचच येणारे थर्टी फर्स्ट व नवीन वर्षाचा पहिला दिवस, हे सर्व दिवस साजरे करण्यासाठी राज्यभरातून पर्यटक मावळातील विविध पर्यटनस्थळी दाखल होत आहेत. खास सेलिब्रेशनसाठी मावळात दाखल होणाऱ्या या पर्यटकांच्या स्वागतासाठी तालुक्यातील ठिकठिकाणचे पर्यटन व्यावसायिक सज्ज झाले आहेत.

अलिकडच्या काळात लोणावळा, खंडाळा बरोबरच मावळ तालुक्याच्या इतर भागातही पर्यटक मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. त्यामुळे तालुक्यात पर्यटन व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर विकसित झाला आहे. दर आठवड्याला शनिवार, रविवार आणि सुट्टीचे दिवस या काळात पुणे-मुंबई सह देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक मावळच्या विविध भागांना भेटी देत असतात.

मावळ तालुक्यातील लोणावळा, खंडाळा, कार्ला, वेहरगाव, मळवली, भाजे याठिकाणी थंड हवेची ठिकाणे म्हणून पर्यटक येतात. तर पवनानगर परिसरात अलिकडे अनेक पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत. त्यात पवना धरणाच्या काठी असणारे टेंट कॅम्पिंग प्रसिद्ध आहेत. या भागात सुमारे १५० ते २०० पर्यटन केंद्रे उभारली गेली आहेत. त्यामुळे दर विकेंडला व सुट्टीच्या दिवशी पर्यटक मोठ्या संख्येने या भागात येत असतात.

पर्यटनासाठी आपल्या भागात येणाऱ्या पर्यटकांच्या राहण्याची चांगली व्यवस्था व्हावी, भोजन व्यवस्था, चहापान, आवडी-निवडी यासह मनोरंजन बाबतही पर्यटन केंद्र धारक काळजी घेत असतात. संपूर्ण मावळ तालुक्यात सुमारे हजार ते दीड हजार पर्यटन केंद्रे विकसित झाली आहेत. यात काहींनी तंबू टाकून तर काहींनी कायमस्वरूपी बांधकामे करून पर्यटन केंद्र उभारलेली आहे.

हेही वाचा       –        राज्यात २७-२८ डिसेंबरदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

मावळात सहकार महर्षी माऊली दाभाडे यांनी पवनमावळ परिसरातील काही पर्यटन केंद्र धारकांना पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत आर्थिक मदत व पर्यटन व्यवसायाचे प्रशिक्षण दिले आहे. तळेगाव येथील रुडसेट संस्थेने सुमारे १०० तरुणांना मोफत पर्यटन व्यवसायाचे प्रशिक्षण दिल्याने त्या सर्वांनी आपापल्या भागात पर्यटन केंद्रे उभारून स्वयंरोजगार सुरू केला आहे.

पवनमावळ, नाणे मावळ, आंदर मावळ भागातही अनेक तरुणांनी पर्यटनाशी निगडीत व्यवसाय सुरू केले आहेत. त्यासाठी लागणारी सगळी सुविधा या तरुणांनी विकसित केली आहे. दरवर्षी डिसेंबर अखेर म्हणजेच नाताळ सणापासूनच मोठ्या संख्येने पर्यटक मावळच्या सर्व ठिकाणच्या पर्यटनस्थळी दाखल होत असतात. आताही या ठिकाणचे पर्यटन केंद्रप्रमुख, मालक हे येणाऱ्या पर्यटकांच्या व्यवस्थेसाठी सज्ज झाले आहेत.

डिसेंबर अखेर काळात येणाऱ्या पर्यटकांची संख्या अधिक असल्याने त्यांच्या व्यवस्थापनासाठी यात जेवण खानपानसाठी मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ हवं असतं. यातून आपसुकच परिसरातील बेरोजगार नागरिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे. पवनानगर, फांगणे, ठाकूरसाई, खडक गेव्हंडे, कोळे चाफेसर, येळसे, कासारसाई, पुसाणे या भागात पर्यटक ये-जा करीत असतात. त्यामुळे येथील स्थानिकांना चांगला रोजगार उपलब्ध झाला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button