महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी अजित पवार तर सहायक आयुक्तपदी सुनील वाघमारे यांची नियुक्ती

- सहायक आयुक्त विजय खोराटे आणि प्रशासन अधिकारी आशा राऊत यांची बदली
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी (क्रमांक 2) पुण्याच्या रोजगार हमी योजनेचे अप्पर आयुक्त अजित पवार यांची नियुक्ती झाली आहे. तर, सहायक आयुक्तपदी सोलापूरच्या सहायक राज्य कर आयुक्त सुनील वाघमारे यांची नेमणूक झाली आहे.
पिंपरी चिचंवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त (क्रमांक 2) दिलीप गावडे हे 31 मे रोजी सेवानिवृत्त झाले. त्याच्या जागी अद्याप कोणत्याही अधिकार्याची नियुक्ती केली गेलेली नाही. हे पद पालिका आस्थापनावरील अधिकार्यासाठी राखीव आहे. मात्र, हे पद गेली 2 महिने रिकामे असल्याने राज्य शासनाने त्या पदासाठी अजित पवार यांची नुकतीच नियुक्ती केली आहे. त्यामुळे पालिका आस्थापनेवरील अधिकार्यासाठी राखीव हे पद गोठविल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. तर, सहायक आयुक्तपदी सुनील वाघमारे यांची नेमणूक झाली आहे.
दरम्यान, पालिकेचे आकाशचिन्ह व परवाना विभागाचे सहायक आयुक्त विजय खोराटे यांची अमरावती महापालिकेत उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. त्याच्याकडील ‘ड’ क्षेत्रीय अधिकारीपदाचा पदभार प्रशासन अधिकारी सीताराम बहुरे व आकाशचिन्ह विभागाचा पदभार सहायक आयुक्त स्मिता झगडे यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. तर, क्रीडा विभागाच्या सहायक आयुक्त आशा राऊत त्यांची अक्कलकोट नगरपरिषदेच्या मुख्याधिकारीपदी बदली केली आहे. त्यांच्याकडील क्रीडा विभाग व ‘ह’ क्षेत्रीय अधिकारी पदाचा तात्पुरता भार सहायक आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे शिस्तीबद्ध अधिकार्याची बदली
महापालिकेच्या प्रशासन अधिकारी आशा राऊत यांना महापालिकेत रूजू होऊन जेमतेम वर्षभराचा कालावधी झाला. क्रीडा विभागास त्यांनी शिस्त लावण्यासाठी कठोर भूमिका घेतली. त्यामुळे क्रीडा विभागात बदल होतील, अशी अपेक्षा महापालिका प्रशासनासह नगरसेवक, पदाधिकारी व क्रीडाप्रेमींना लागली होती. मात्र, कालावधी पूर्ण न करताच अचानक असा शिस्तीबद्द अधिकार्याची बदली झाल्याने राजकीय हस्तक्षेप झाल्याची चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.





