‘युती की स्वबळ?’ आगामी निवडणुकांसाठी भाजपची जोरदार फिल्डिंग

मुंबई : महाराष्ट्रात नगरपालिका निवडणुका जाहीर होताच भाजपने जोरदार तयारी सुरू केली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे प्रत्येक शहरातील पक्ष निरीक्षकांनी नावांची यादी पाठवली आहे. ‘मित्र पक्षांसोबत युती करायची की नाही करायची, युती करायची असेल तर कशाप्रकारे पुढे जायचं? नसेल करायची तर स्वबळासंदर्भात लढण्याची तयारी आहे की नाही? यासंदर्भात देखील या सगळ्या निरीक्षकांकडून माहिती घेण्यात आली, अशी माहिती समोर आली आहे.
निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच भाजपने प्रत्येक नगरपालिकेमध्ये निरीक्षक पाठवून मोर्चेबांधणी केली होती. या निरीक्षकांनी स्थानिक पदाधिकारी आणि शहर कार्यकारिणीशी चर्चा करून प्रत्येक नगरपालिकेतून तीन संभाव्य उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत. ही यादी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना सादर करण्यात आली आहे. तसेच, भविष्यात नगराध्यक्ष कोण असावा, याबाबतही निरीक्षकांनी पदाधिकाऱ्यांची मते जाणून घेतली आहेत.
हेही वाचा – स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका : मतदारयादीवरील आक्षेप याचिका उच्च न्यायालयाने फेटाळल्या
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा कार्यक्रम अखेर जाहीर झाला आहे. यानुसार, राज्यातील 246 नगरपरिषदा आणि 42 नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबर 2025 रोजी मतदान होणार असून, 3 डिसेंबर 2025 रोजी मतमोजणी केली जाईल. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया 10 नोव्हेंबरपासून सुरू होईल आणि अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत 17 नोव्हेंबरपर्यंत असेल. ही निवडणूक प्रक्रिया इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांद्वारे पार पडेल आणि यासाठीची आचारसंहिता तात्काळ लागू करण्यात आली आहे. या निवडणुका ऑक्टोबरच्या अखेरीस अद्ययावत केलेल्या मतदार यादीनुसार घेण्यात येतील, असेही राज्य निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
मुंबईसह राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकांसंदर्भात मोठी बातमी समोर आली आहे. राज्य निवडणूक आयोगाने मतदार यादीचा कार्यक्रम बदलला आहे. आयोगाच्या अधिसूचनेनुसार, ‘प्रारूप प्रभागनिहाय मतदार यादी आता 14 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाईल’. यापूर्वीच्या वेळापत्रकात बदल झाल्याने निवडणूक प्रक्रियेला आणखी उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. नवीन कार्यक्रमानुसार, मतदार याद्यांवरील हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम मुदत 22 नोव्हेंबरपर्यंत असेल.
प्राप्त झालेल्या हरकती निकाली काढून 6 डिसेंबर रोजी अंतिम प्रभागनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर, 8 डिसेंबरला मतदान केंद्रांची यादी प्रसिद्ध होईल आणि 12 डिसेंबर रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. मात्र, मतदार नोंदणीसाठीच्या कट-ऑफ डेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, असेही आयोगाने स्पष्ट केले आहे.




