‘एक ते दोन दिवसांत युती’; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे : महापालिका निवडणुकांसाठी शिवसेना आणि भाजपमध्ये सन्मानजनक युती होईल. एक ते दोन दिवसांत त्यास अंतिम स्वरुप दिले जाईल, असे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश मुख्यमंत्री फडवणीस यांचे आहेत. ते प्रत्येक महापालिकेचा आढावा घेत आहेत, असेही शिंदे म्हणाले.
ठाणे येथे शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रकाश महाजन यांनी शिंदे गटात पक्ष प्रवेश केला. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. शिवसेना आणि भाजप विचारांची युती आहे. केंद्रात आणि महाराष्ट्रात महायुतीचे सरकार आहे. बाळासाहेबांची विचारधारा पुढे घेऊन जाण्याचे काम शिवसेना करत आहेत.
महाराष्ट्रात महापालिका निवडणुकांसाठी महायुतीच्या बैठका सुरू आहेत. महायुती म्हणून आम्ही निवडणूक लढविणार आहोत. युतीची चर्चा अंतिम टप्प्यात आहे. आमची युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी झालेले नाही. सध्या युत्या- आघाड्या होत आहेत. त्या फक्त खुर्ची, स्वार्थ आणि सत्ता यासाठी होत असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी ठाकरे गट आणि मनसेवर केली.
हेही वाचा – H-1B व्हिसा मुलाखती अचानक मे 2026 पर्यंत पुढे ढकलल्या, भारताने व्यक्त केली चिंता
आगामी महापालिका निवडणुकीत बाळासाहेबांचे विचार आणि विकासाचा अजेंडा घेऊन लोकांसमोर जात आहोत. सन्मानजनक युती होणार असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः दररोज त्याचा आढावा घेत आहेत. प्रत्येक महापालिकेतील पदाधिकाऱ्यांना ते स्वतः बोलवित आहेत आणि युतीच्या बद्दल विचारणा करत आहेत. युती झाली पाहिजे असे स्पष्ट आदेश फडणवीस यांचे आहेत. महायुती प्रचंड मतांनी विजयी होईल, असा दावा उपमुख्यमंत्री शिंदे यांनी केला.
माजी महापौर मिनाक्षी शिंदे यांचा समर्थक असलेल्या शाखाप्रमुखावर पक्षातून निलंबनाची कारवाई झाल्याने मिनाक्षी शिंदे यांनी ठाणे महिला जिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला होता. याविषयी एकनाथ शिंदे यांना पत्रकारांनी विचारले असता, मिनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क झाला आहे. त्यांच्यासोबत चर्चा केली जाईल. हा आमच्या कुटुंबातील विषय आहे असे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.
मनसेचे प्रवक्ते प्रकाश महाजन यांनी काही दिवसांपूर्वीच पक्षाचा राजीनामा दिला होता. शुक्रवारी त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात पक्ष प्रवेश केला.





