Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

नवी मुंबई ते सिंधुदुर्ग चिपी विमानसेवा १५ ऑगस्टपूर्वी सुरू होण्याची शक्यता; नितेश राणे यांची ‘Fly91’ सोबत बैठक

सावंतवाडी: कोकणातील हवाई संपर्क अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे. नवी मुंबई ते सिंधुदुर्ग (चिपी) विमानसेवा आगामी स्वातंत्र्यदिनापूर्वी (१५ ऑगस्ट) सुरू करण्यासाठी सकारात्मक हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच आगामी गणेशोत्सवाच्या काळात कोकणवासीयांची गैरसोय टाळण्यासाठी या मार्गावर अतिरिक्त उड्डाणे (फ्लाईट्स) वाढवण्याची तयारी दर्शवण्यात आली आहे. यासंदर्भात मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

​या बैठकीत ‘Fly91’ विमान कंपनीचे सीईओ श्री. मनोज चाको यांच्यासोबत सविस्तर चर्चा करण्यात आली. नवी मुंबई–चिपी विमानसेवा लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या तांत्रिक आणि प्रशासकीय बाबींचा आढावा यावेळी घेण्यात आला. या विमानसेवेच्या यशस्वी प्रारंभासाठी राज्य शासनाच्या वतीने आवश्यक ते सर्व सहकार्य आणि पाठबळ दिले जाईल, असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी कंपनीला दिले.

​दरवर्षी गणेशोत्सवाच्या काळात मुंबई-नवी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या प्रचंड असते. हीच वाढती गर्दी आणि प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन, उत्सव काळात अतिरिक्त उड्डाणांची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. यामुळे आगामी गणेशोत्सवात कोकणवासीयांसह पर्यटकांनाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

”नवी मुंबई–चिपी विमानसेवा सुरू झाल्यानंतर सिंधुदुर्गसह संपूर्ण कोकणाचा देशातील प्रमुख शहरांशी हवाई संपर्क अधिक मजबूत होईल. याचा थेट फायदा स्थानिक पर्यटन, व्यापार आणि अर्थव्यवस्थेला होणार असून, कोकणाच्या सर्वांगीण विकासाला यामुळे नवी गती मिळेल.”

हेही वाचा –  गायमुख ते फाउंटन हॉटेल बोगदा, भाईंदर उन्नत पूल आणि नवी मुंबई मेट्रो विस्ताराला मुख्यमंत्र्यांची मान्यता

एकीकडे नवीन विमानसेवेच्या घोषणा होत असताना, दुसरीकडे गेल्या दीड वर्षांपासून मुंबई-सिंधुदुर्ग विमानसेवा बंद असल्यामुळे स्थानिक आणि पर्यटकांमध्ये तीव्र नाराजी आहे. सातत्याने आश्वासने देऊनही ही सेवा सुरू न होणे हे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींचे अपयश असल्याची टीका होत आहे.

​रोजगाराच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, विमानतळाच्या परिसरात एकही मोठा रोजगार देणारा प्रकल्प अद्याप आलेला नाही. सद्यस्थितीत येथील केवळ ३० ते ३५ स्थानिक युवकांना रोजगार मिळाला आहे, मात्र तो त्यांच्या शिक्षणाच्या योग्यतेनुसार नसून सिक्युरिटी गार्ड किंवा गार्डन बॉय अशा स्वरूपाचा आहे. परिसरातील एकही तरुण या विमानतळावर उच्च पदावर कार्यरत नसल्याने रोजगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे.

​पुणे, बेंगलोर आणि हैदराबाद या मार्गांवर ‘Fly91’ विमान कंपनी अत्यंत योग्य सेवा देत आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील विमान उड्डाणाची लाज या कंपनीने राखली आहे, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. ‘Fly91’ ही विमान कंपनी जर सिंधुदुर्गात दाखल झाली नसती, तर येथील विमानतळ सेवा पूर्णपणे बंद होण्याची स्थिती निर्माण झाली होती. मात्र, या कंपनीने प्रवाशांना उत्कृष्ट सेवा देत आपले उड्डाण यशस्वीरीत्या सुरू ठेवले आहे.

​१२ सप्टेंबर २०१८: पहिली चाचणी फ्लाईट.

​५ मार्च २०१९: अधिकृत कामकाजाची सुरुवात.

​९ ऑक्टोबर २०२१: अलायन्स एअरद्वारे पहिली व्यावसायिक मुंबई उड्डाण सेवा सुरू झाली. मात्र, अत्यंत महत्त्वाची असलेली ही मुंबई सेवा गेल्या दीड वर्षांपासून बंद आहे. चाकरमानी मुंबई वरून ये जा करत पण मुंबई सेवा बंद झाल्याने गैरसोय झाली. सुदैवाने गोवा राज्यातील मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रवाशांना या सेवेचा लाभ घेता येत आहे.

दरम्यान मुंबई, हैदराबाद आणि बेंगलोर या तिन्ही मार्गांवर जर नियमित आणि शाश्वत विमानसेवा सुरू झाली, तरच कोकणातील पर्यटनाला खऱ्या अर्थाने चालना मिळेल आणि कोकणच्या सर्वांगीण विकासाचे स्वप्न साकार होईल, अशी अपेक्षा आता स्थानिक पर्यटन व्यवसायिकांकडून व्यक्त केली जात आहे. सध्या पुणे, बंगलोर व हैद्राबाद सेवा सुरू आहे. मात्र मुंबईशी कनेक्शन असलेल्यांची संख्या अधिक आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button