मंत्री गिरीश महाजन यांना ‘त्या’ प्रकरणी उच्च न्यायालयाकडून दिलासा

मुंबई : राज्याचे जलसंपदा मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते गिरीश महाजन यांच्याविरुद्ध दोन युट्यूब वाहिन्यांनी प्रसिद्ध केलेल्या सहा चित्रफिती या सकृतदर्शनी बदनामीकारक भासतात, असे उच्च न्यायालयाने नुकतेच नमूद केले. तसेच त्या तातडीने हटवण्याचे आदेश दिल्याने मंत्री गिरीश महाजन यांना दिलासा मिळाला आहे.
या चित्रफिती पाहिल्यानंतर महाजन हे अंतरिम दिलासा मिळण्यासाठी पात्र आहेत, असेही न्या. आरिफ डॉक्टर यांच्या एकलपीठाने आदेशात नमूद केले. चित्रफितींमध्ये प्रतिवाद्यानी महाजन यांच्याबाबत केलेले विधान हे सकृतदर्शनी बदनामीकारक आहे हे संभाषण प्रतीवरून स्पष्ट होत असल्याचेही न्यायालयाने म्हटले. त्यामुळे, या चित्रफिती तातडीने हटवण्याचे आदेश देण्यासह महाजन यांच्याविरुद्ध बदनामीकारक वक्तव्याचा समावेश असलेल्या कोणत्याही चित्रफिती किंवा मजकूर प्रसिद्ध करण्यास देखील न्यायालयाने प्रतिवाद्यांना मज्जाव केला.
हेही वाचा – एक गाव, एक पोलीस’ योजनेची सुरूवात
पत्रकार अनिल थत्ते आणि आणखी एका व्यक्तीने आपल्याविरुद्ध खोटे, बेपर्वा आणि निराधार आरोप केल्याचा दावा करून त्यांच्याविरोधात महाजन यांनी मानहानीचे प्रकरण दाखल केले होते. तसेच आपली बदनामी करणाऱ्या सहा चित्रफिती संबंधित युट्यूब वाहिनीवरून हटवण्याचे आदेश प्रतिवाद्यांना द्यावेत, अशी मागणी महाजन यांनी न्यायालयाकडे केली होती. सहापैकी पाच चित्रफिती युट्यूबर आणि पत्रकार अनिल थत्ते यांच्या अनिल गगनभेदी थत्ते या युट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झाल्या होत्या, तर एक चित्रफीत श्याम गिरी यांच्या मुद्दा भारत का या युट्यूब वाहिनीवर प्रसिद्ध झाली होती.