Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवडच्या आमदारांनी महापालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा महायुतीवर घणाघाती हल्ला

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील तीनही आमदारांनी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेला भ्रष्टाचाराचे कुरण केले आहे. त्यामुळे या विधानसभा निवडणुकीमध्ये आता पिंपरी, चिंचवड व भोसरी या तीनही विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या उमेदवारांना विजयी करण्याचे आवाहन खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केले व महायुतीवर त्यांनी घणाघाती हल्ले चढवले.

पिंपरी विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या संवाद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी खासदार डॉ. अमोल कोल्हे बोलत होते. या संवाद मेळाव्यास शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्क नेते आमदार सचिन आहेर हेही उपस्थित होते. या मेळाव्यास महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, सी पी आय, सी पी एम आर पी आय खरात गट आदी प्रमुख पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रस्ताविक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष तुषार कामठे यांनी केले.

हेही वाचा      –        बालगंधर्व रंगमंदिर येथे मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, ही निवडणूक केवळ विधानसभेची नाही, तर महाराष्ट्र यापुढे कोणत्या दिशेने जाणार आहे ती दिशा ठरवणारी निवडणूक आहे. आपण जसा शर्ट, चप्पल खरेदी करतो तसे आमदारही खरेदी करू शकतो हे महायुती सरकारने दाखवून दिले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचा पराभव झाला. आता विधानसभा निवडणुकीत पुन्हा पराभव टाळण्यासाठी म्हणून, ‘लोकसभा निवडणुकीत झाली मताची कडकी, म्हणून आणली योजना बहिण लाडकी’ असे सांगत कोल्हे म्हणाले की, युती सरकारने आपल्या काळात सामाजिक न्याय विभागाचा निधी मतांच्या खरेदीसाठीच्या योजनांसाठी वळवला आहे. महाराष्ट्रावर या सरकारमुळे साडेआठ लाख कोटी रुपयांचे कर्ज झाले आहे.

आमिष दाखवून मते वळवण्याचा प्रयत्न…

खा. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, रिंग रोड योजना ही १८ हजार कोटी रुपयांची मंजूर करण्यात आली होती, मात्र तिचा खर्च चाळीस हजार कोटींवर गेला आहे. हा मलिदा कोणी खाल्ला हे मतदारांना ठाऊक आहे. विकासासाठी व हिंदुत्वासाठी जे तिकडे गेले त्यांना याबाबत आता जाब विचारण्याची वेळ आली आहे. राज्यातील युती सरकारने विविध अमिष दाखवून राज्यातील भगिनींची मते खरेदी करण्याचे प्रयत्न चालवले आहेत. त्यांनी स्वार्थासाठी सर्वसामान्य माणसाचे छप्पर काढून घेतले आणि सांगतात तुम्हाला चादर देतो आहे.
या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जो त्याग दाखवला आहे त्या त्यागाची जाणीव निश्चितपणे ठेवली जाईल असे सांगत निवडणुका तंत्र बदलले असून आता निवडणुका बुथवर लढल्या जातात त्यासाठी अतिशय सतर्क रहावे लागते. असे सांगत शिरूर लोकसभा निवडणुकीच्या वेळी बूथ यंत्रणेने दाखवलेल्या तत्परतेमुळे चौदाशे ईव्हीएम मशीन आम्ही बदलून घेतले व त्यामुळे माझा विजय झाला अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.

गाफील राहून चालणार नाही : डॉ. कोल्हे

पिंपरी विधानसभेचे सर्व सर्वेक्षण अहवाल आलेले असून त्यात विद्यमान आमदारांचा पराभव होणार असा अभिप्राय आहे. त्यामुळे ही आपल्याला मिळालेली संधी आहे. या मतदारसंघात महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. सुलक्षणा शिलवंत यांचा विजय निश्चित आहे, पण आपण गाफील राहून चालणार नाही असेही त्यांनी यावेळी बोलताना सांगितले. डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे शरद रावजी पवार उमेदवार, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे साहेब उमेदवार, सुलक्षणा शिलवंत उमेदवार म्हणजे शिव शाहू फुले आंबेडकरांचे विचार, असे सांगत खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी डॉ. सुलक्षणा शिलवंत यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन केले.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button