महापालिकेच्या मोकळ्या जागांवरील अतिक्रमणाचा मुद्दा ऐरणीवर!
विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी–चिंचवड | पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या ताब्यात असलेल्या मोकळ्या जागांवर होत असलेल्या अतिक्रमणाबाबत गंभीर चिंता व्यक्त करत विधी समिती सभापती सुजाता बोराटे यांनी आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांना सविस्तर निवेदन सादर केले आहे.
या निवेदनात त्यांनी नमूद केले आहे की, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध भागांमध्ये महापालिकेच्या मालकीच्या अनेक मोकळ्या जागा उपलब्ध आहेत. या जागांचा भविष्यात शाळा, रुग्णालये, उद्याने, सार्वजनिक सुविधा तसेच विकास प्रकल्पांसाठी उपयोग होऊ शकतो. मात्र सध्या या जागांवर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत अतिक्रमण होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
सुजाता बोराटे यांनी आपल्या पत्रात स्पष्टपणे म्हटले आहे की, या अतिक्रमणांमुळे शहराच्या नियोजन प्रक्रियेवर विपरीत परिणाम होत असून भविष्यातील विकासकामांमध्ये अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. तसेच अतिक्रमणामुळे परिसरात अस्वच्छता वाढणे, वाहतुकीच्या समस्या निर्माण होणे आणि कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न उद्भवणे, अशा तक्रारी नागरिकांकडून सातत्याने येत आहेत.
हेही वाचा : पिंपरी-चिंचवडच्या विकासकामांना स्थायी समितीची गती
या पार्श्वभूमीवर त्यांनी आयुक्तांकडे पुढील महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. महापालिकेच्या सर्व मोकळ्या जागांची नियमित पाहणी करण्यात यावी, ज्या ठिकाणी अतिक्रमण झाले आहे ते तातडीने हटविण्यात यावे, अशा जागांभोवती कुंपण (फेन्सिंग) घालून त्यांचे संरक्षण करण्यात यावे, संबंधित ठिकाणी “महापालिकेची मालमत्ता” असे स्पष्ट फलक लावण्यात यावेत, तसेच अतिक्रमण रोखण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि नागरिक यांच्यात प्रभावी समन्वय साधण्यात यावा.
शहराचा नियोजित विकास, सार्वजनिक मालमत्तेचे संरक्षण आणि नागरिकांच्या सोयीसाठी महापालिकेने या विषयाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी अपेक्षा सुजाता बोराटे यांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या या मागणीमुळे महापालिका प्रशासन अतिक्रमणविरोधी मोहिमेला गती देणार का? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराच्या भविष्यातील नियोजित विकासासाठी महापालिकेच्या ताब्यातील मोकळ्या जागांचे संरक्षण अत्यंत महत्त्वाचे आहे. या जागांवर होत असलेले अतिक्रमण थांबवले नाही, तर उद्या शाळा, रुग्णालये, उद्याने आणि सार्वजनिक सुविधांसाठी आवश्यक जागाच उपलब्ध राहणार नाहीत. त्यामुळे नागरिकांच्या हितासाठी आणि शहराच्या सुव्यवस्थित विकासासाठी या विषयावर प्रशासनासोबत समन्वय साधून मी आमदार महेशदादा लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतः पाठपुरावा करणार असून, महापालिकेच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यात कोणतीही तडजोड होऊ दिली जाणार नाही.
– सुजाता निलेश बोराटे, सभापती, विधी समिती, पिं. चिं. मनपा.
महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा





