ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ताथवडे–पुनावळे अंडरपासची ‘कोंडी’

कोणाचेच लक्ष का नाही? : नागरिक संतप्त, प्रशासन-लोकप्रतिनिधींवर गंभीर प्रश्न

पिंपरी-चिंचवड । विशेष प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील पुणे-मुंबई महामार्गावर ताथवडे आणि पुनावळे अंडरपास भागात दररोजची वाहतूक कोंडी, पावसाळ्यात होणारे पाणी साचणे आणि अपघाताचा वाढता धोका यामुळे नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. परिस्थिती दिवसेंदिवस बिघडत असताना देखील स्थानिक पातळीवरील लोकप्रतिनिधी आणि संबंधित यंत्रणांची भूमिका पूर्णपणे निष्क्रिय असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे.

सोसायटीधारक, वाहनचालक आणि स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र संतापाची भावना आहे. “कर भरायचा आमच्याकडून आणि रोज जीव मुठीत घेऊन प्रवास करायचा का?” असा थेट सवाल नागरिक विचारत आहेत. दररोज सकाळ-संध्याकाळ या भागात होणारी प्रचंड वाहतूक कोंडी ही आता नित्याचीच बाब झाली आहे.

महत्वाचे म्हणजे, हा परिसर जर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) अखत्यारीत येत असेल, तर स्थानिक नगरसेवक, आमदार आणि खासदार यांनी समन्वय साधून ठोस उपाययोजना करण्यासाठी दबाव टाकणे अपेक्षित आहे. मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळीच दिसते. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, जबाबदार लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष ठिकाणी भेट देऊन समस्या समजून घेण्यासाठीही पुढे येताना दिसत नाहीत.

हेही वाचा

कायदा-सुव्यवस्थेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे; आमदार महेश लांडगे

पावसाळ्यात या अंडरपासमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर बनते. अनेक वेळा वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, काही वेळा नागरिकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो. तरीही कायमस्वरूपी तोडगा किंवा स्पष्ट कृती आराखडा अद्याप जाहीर झालेला नाही.

नागरिकांचा स्पष्ट प्रश्न आहे — फक्त आश्वासने पुरेशी आहेत का? की प्रत्यक्ष काम, नियोजन आणि वेळबद्ध उपाययोजना केव्हा दिसणार? ताथवडे–पुनावळे अंडरपास परिसरातील ही कोंडी आता केवळ वाहतुकीचा प्रश्न राहिलेला नसून, प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी समस्या बनली आहे. नागरिक आता तात्पुरत्या उपायांपेक्षा ठोस आणि दीर्घकालीन समाधानाची मागणी करत आहेत.

वाहतूक कोंडीत अडकलेल्या रुग्णाची परवड…

पुनावळे येथील अंडरपास जवळ मध्यरात्रीच्या सुमारास भीषण वाहतूक कोंडी निर्माण झाली असून, यात सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रात्रीचे १२:३० वाजले तरीही रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विशेष म्हणजे, या कोंडीमध्ये रुग्णालयातून घरी परतणारे रुग्णही अडकले असून त्यांना अर्ध्या तासाहून अधिक काळ एकाच जागेवर ताटकळत राहावे लागत आहे. प्रशासकीय नियोजनाच्या अभावामुळे आपत्कालीन परिस्थितीतही रस्ता मोकळा मिळत नसल्याने नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर परिस्थितीवर संताप व्यक्त करताना एका वाहनचालकाने सांगितले की, “प्रशासकीय कर्मचारी असोत वा पोलीस, कोणालाही सामान्य जनतेच्या त्रासाची पडलेली नाही.” घटनास्थळी वाहतूक नियमन करण्यासाठी एकही कर्मचारी उपस्थित नसल्याने बेशिस्त वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला आहे. “केवळ कर भरायचा आणि हा त्रास सहन करायचा का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत. ही कोंडी सोडवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी पुनावळेतील रहिवाशांकडून केली जात आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button